- पथकर वसुलीला हिरवा सिग्नल; स्थानिकांच्या वाहनांसाठी सुधारित दर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून जाणारा पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी व चांडोली टोलनाका ऑक्टोबर २०२१ ला बंद करण्यात आला होता. परंतु, आता पुन्हा नव्याने या टोल नाक्यावरील पथकर वसुलीला हिरवा सिग्नल दिला आहे. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या प्रकल्पाची मुदत ८ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री १२ नंतर समाप्त झाली होती. त्यामुळे मेसर्स ए टी आर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडला (आयआरबी) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पथकर वसुली बंद करण्याचा आदेश दिला होता. आता पुन्हा नव्याने गुरुवार (दि.५) पासून टोलवसुली सुरू करण्यात येणार आहे.
स्थानिक नागरिकांच्या वाहनांना वीस किलोमीटर प्रवासाचा सवलतीचा ३१५ रुपये किमतीचा मासिक पास घ्यावा लागणार आहे. याबाबत जाहीर प्रकटन प्राधिकरणाने प्रसिद्ध केले आहे. पुढील एक वर्षासाठी हे दर असणार आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप निर्माण होत आहे.


















