- भाजपकडून बिनविरोधसाठी प्रयत्न; निवडणूक लागल्यास भाजपची मोठी दमछाक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जानेवारी २०२२) :- २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड मतदारसंघात भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप विजयी झाले होते. मात्र त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली असून, लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.
लक्ष्मण जगताप हे पूर्वी राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यांनी नंतर भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे चिंचवडची जागा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पिंपरी- चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने या पोटनिवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आज शनिवारी पिंपरी चिंचवड शहरात आले होते. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे उपस्थित होते.
पत्रकारांनी चिंचवडच्या रिक्त जागेसंबंधी अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक निवडणूक आयोग लावेल. अजून तरी निवडणूक लढविण्याबाबत अद्याप महाविकास आघाडीची भूमिका ठरली नाही. २०१९ च्या निवडणुकीत चिंचवडची जागा आम्ही पुरस्कृत केली होती. कसब्याची जागा काँग्रेसने लढविली होती. त्यानंतरच्या काळात ब-याच प्रकारची राजकीय स्थित्यंतरे झाली असल्यामुळे त्यासंदर्भात शेवटी आम्ही सर्व सहका-यांशी चर्चा करु आणि त्याबाबतचा अंतिम निर्णय घेवू. आताच लगेच, निवडणूक लागली नसताना चर्चा करण्यात अर्थ नाही, असे माझे स्वत:चे मत आहे. त्यामुळे त्या-त्या वेळची परिस्थिती बघून निवडणूक लढविण्याबाबत आम्ही योग्य तो निर्णय घेऊ, असे पवार यांनी स्पष्ट केले.
तर, या ही जागा कायम राखण्याचे आव्हान भाजपपुढे उभे ठाकले आहे. येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास भाजपला महापालिका निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही जागांवर निवडणूक न होता बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जाणार आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने अखेरच्या क्षणी माघार घेतली. त्याच धर्तीवर कसबा पेठ आणि चिंचवड येथील पोटनिवडणूक बिनविरोध व्हाव्यात यासाठी भाजपकडून राष्ट्रवादीला साकडे घालण्यात येऊ शकते.