न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने भोसरी येथे सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची निर्मिती केली आहे. यात अद्ययावत यंत्रणा व उपकरणांचा समावेश आहे. रुग्णसेवा पुरविणेकामी खाजगी ठेकेदाराला यंत्रणेसह हे रुग्णालय खाजगी तत्वावर देण्याचा घाट महापालिकेने घातलेला आहे. त्याबदल्यात कोणतेही भाडे न आकारता पुर्ण रुग्णालय खासगी संस्थेस चालविण्यास महापालिका देणार आहे. आधार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भुंबे यांनी खासगीकरण रद्द करणेबाबत पंतप्रधान कार्यालयास पाठवले होते.
या पत्राची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आहे. याबाबत अधिक माहिती देताना भुंबे म्हणाले की, भोसरी हॉस्पिटलचे खासगीकरण रद्द व्हावे यासाठी पंतप्रधान कार्यालयास निवेदन पाठवले होते. तसेच पंतप्रधान कार्यालयाने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असेही सुचित करण्यात आले होते. त्यावर आता पंतप्रधान कार्यालयाने मुख्यमंत्री कार्यालयास याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. तत्पूर्वी भुंबे यांनी मुख्यंमत्री कार्यलयास देखील हे निवेदन दिले होते. परंतु, त्याची दखल घेतली गेली नाही.
भोसरी हॉस्पिटल खासगीकरणाबाबत पिंपरी चिंचवड ममहापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी लेखी आश्वासन दिले होते की ”तीन महिन्यांनी सभागृहात तो खासगीकरणाचा प्रस्ताव पुन्हा आणु आणि नगरसेवकासमोर मांडु. नगरसेवक विरोध करतील, अशी अपेक्षा करू, नाहीतर तो प्रस्ताव कायदेशीररित्या रद्द करण्याबाबत प्रयत्न चालुच आहेत. मात्र, हा लढा खासगीकरण रद्द होईपर्यंत चालूच राहील, अशी भूमिका भुंबे यांनी घेतली आहे.











