न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १० मार्च) :- नवनविन तंत्रज्ञान विकसित करून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शैक्षणिक, सामाजिक व औद्यौगिक विकास साधावा, असा सूर देश विदेशातील अनेक मान्यवरांनी काढला. चऱ्होली येथील डॉ. डी. वाय पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये “इन्क्युबेशन – ४ – नवं विचार व तंत्रज्ञान द्वारे जागतिक स्तरावरचे व्यवसाय व्यवस्थापन ” या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रायपुर येथील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ़ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. भारत भास्कर, नेपाळ देशाचे विद्यापीठ आयोगाचे सचिव डॉ. देवराज अधिकारी, श्रीलंकेचे डॉ अशोका जीनादासा, बांग्लादेशातील डॉ. मुशर्रफ हुसैन, इंग्लंडचे प्रा अब्दुल देवाले महम्मद, इंग्लंडचे उद्योजक रॉन चंडीमलानी, कॅनडाचे प्रा. कृष्णा लाल, शशी अधिकारी, अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर, समन्वयक डॉ. ओ. पी हलदार उपस्थित होते.
यावेळी डॉ. भास्कर म्हणाले कि, नवनिर्मिती ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रीया आहे. तंत्रज्ञान व नवनिर्मितीच्या माध्यमातून समस्या मार्गी लागू शकतो.
कंपन्यांनी बदलत्या कालानुरूप तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. अन्यथा जागतिक स्पर्धेत टिकणार नाही. नवनिर्मितीसाठी अथकपणे संशोधन केले पाहिजेत. संशोधनासाठी अनुकूल वातावरण निर्मितीची आवश्यकता आहे. डबघाईला आलेल्या नोकियाचे उदाहरण देत उत्पादन न करता यशस्वी ठरलेल्या ओला, ॲमेझॉन, स्विगी या कंपन्यांचे उदाहरण दिले.
हुसैन म्हणाले की, कुशल मनुष्यबळावर उद्योग अवलंबुन असतो. मात्र, काही ठिकाणी हल्ली कामाच्या वेळेत सोशल मिडियाचा वापर करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
डॉ. खेडकर म्हणाले की, शेतीवर ६० ते ७० जनता अवलंबून आहे. औद्योगिक क्षेत्रासोबतच शेती व संबंधीत उद्योग क्षेत्रात नवनिर्मितीची गरज आहे. पारंपारिक शेतीला अधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज आहे.विद्यापीठाची माहिती देत आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज सुधारण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सरकार म्हणाले की, नेपाळ आणि भारताचे संबंध १९९८ पासून आहे. ते नाते अधिक सुदृढ व्हावेत. सरकार आणि विद्यापीठ यांच्यात समन्वय असावा. भारत ही भविष्यात जगात अग्रेसर अशी मोठी बाजारपेठा असेल.
तसेच या परिषदेत कॅनडा, इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया आणि थायलंड या राष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवर शिक्षण तज्ज्ञ सहभागी झाले होते.
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी डॉ अरुण इंगळे, डॉ शैलेश कासांडे, डॉ. पराग कालकर, डॉ. एस बी मेहता, डॉ. सायली गणकर, डॉ. शिल्पा भिडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. परिषदेच्या सांगता प्रसंगी स्पायसर ॲडव्हेटीस्ट विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजीवन आरसूड,अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर यांनी आपले विचार मांडले.
सूत्रसंचालन डॉ. श्रीकला बच्छाव, प्रा चेतन खेडकर, प्रा वर्षा पटेल प्रा. सपना चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. ओमप्रकाश हलदार यांनी मानले.











