न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२३) :- स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केबल इंटरनेट नेटवर्कच्या निविदेसाठी ठेकेदारांनी महापालिकेकडे दिलेला टाटा टेलीसर्व्हिसेसचा अनुभवाचा दाखला बोगस असल्याचे उघड झाले आहे. याबाबतचे पत्र कंपनीने स्मार्ट सिटीला पाठविले आहे. त्यामुळे निविदा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बेजबाबदारपणे ही निविदा प्रक्रिया हाताळल्यामुळे महापालिका प्रशासनावर संशयाची सुई आहे.
महापालिकेत गेल्या दोन महिन्यांपासून इंटरनेट डक्ट निविदेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. भाजपनेही निविदेविषयी आक्षेप नोंदविला होता. आयुक्त शेखर सिंह यांनी आक्षेपांची तपासणी केली.
पिपरी-चिंचवडच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुमारे सहाशे किलोमीटर लांबीचे अंडरग्राउंड केबल इंटरनेट डक्ट तयार केले आहेत. नेटवर्क भाड्याने देण्यासाठी महापालिकेने सुमारे तीनशे कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. या निविदेमध्ये सुयोग टेलीमॅटिक्स व फायबर स्टोरी कम्युनिकेशन्स यांनी निविदा भरली. त्यातील अटीशर्तीनुसार कंपनीकडे अनुभव असणे आवश्यक होते. त्यानुसार, अनुभव दाखले दिले असून, त्यात पात्र झालेल्या कंपन्यांनी टाटा टेलीसर्व्हिसेस लिमिटेड यांचा अनुभवाचा दाखला जोडला आहे. याबाबत टाटा कंपनीकडे पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या स्मार्ट सिटीला पत्र पाठविले आहे. तसेच आम्ही कोणताही अनुभवाचा दाखला दिला नसल्याचे कळविले आहे.
निविदे प्रक्रियेमध्ये मोठी अनागोंदी असल्याबाबतच्या तक्रारी झाल्या होत्या, परंतु त्याकडे दुर्लक्ष करत महापालिका आयुक्त आणि प्रशासनाने ही निविदा रेटण्याचा प्रयत्न केला. प्रशासन कंपनीला आणि त्यांच्या कृत्याला पाठिशी घालत आहेत. त्यांना कामाचे आदेशही दिले आहेत. आम्ही वारंवार कंपनीने सादर केलेल्या बोगस कागदपत्रांवर आक्षेप नोंदविल्यानंतरही त्याची शहानिशा केली नाही, असा आरोप माजी नगरसेविका सीमा सावळे यांनी केला.