- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली जगताप कुटुंबीयांची धावती भेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२२) :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सायंकाळी अचानक दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबीयांची अर्धा तास भेट घेऊन चर्चा केली. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धावती भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी जगताप कुटुंबीयांशी उमेदवारीबाबत चर्चा केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीसाठी भाजप कोणाला उमेदवारी देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांचे बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिवंगत आमदार जगताप यांच्या कुटूंबातून कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत लवकरात लवकर नाव निश्चित करा, अशी चर्चा झाल्याची माहिती आहे.
भाजपमध्ये अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांच्यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची याची सध्या चर्चा सुरू आहे. तसेच दुसऱ्या अन्य कोणाला उमेदवारी दिली तर इच्छुकांची यादी मोठी आहे. त्यामुळे इच्छुक सर्व नेत्यांचे मन राखणे भाजपला आता महत्त्वाचे ठरणार आहे.
जर भाजपला ही पोटनिवडणूक बिनविरोध करायची असेल, तर लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी यांना उमेदवारी द्यावी लागण्याची शक्यता आहे. त्यावरून जगताप कुटुंबीयांमध्ये वाद उद्भवू नये, यासाठी चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री आले असावे, अशीदेखील चर्चा राजकीय वर्तुळात होती.