- इंद्रायणीथडीसारखे भव्य दिव्य सोहळे नकोत; संवर्धनासाठी कायमची दूरदृष्टी हवी..
- महापालिकेकडून अॅक्शन; तब्बल सहा कंपन्यावर गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२२) :- इंद्रायणी नदीमध्ये केमिकलयुक्त सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे नदीतील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले जात आहे. प्रदूषित पाण्यामुळे नदीपात्रातील जलचरांवर गंभीर परिणाम होत आहेत. तसेच नदीचे पात्रही प्रदूषित होत आहे. याविरोधात तातडीने पावले उचलत नदीपात्रात सांडपाणी सोडणाऱ्या मारुती लोंढे-क्वालिटी कोटींग वर्क्स शेलारवस्ती, चिखली, कुमार मोहन प्रजापती-डायनॅमिक प्लास्टिक इंडस्ट्रीज शेलारवस्ती, चिखली.,मोरेश्वर मुंगसे-ओम इंडस्ट्रीज, शेलारवस्ती, चिखली, सचिन साठे-वरद इन्फोटेक शेलारवस्ती, चिखली, सुरेश अग्रवाल, हरीदर्शन प्रा. लि. शेलारवस्ती, चिखली., विश्वेश देशपांडे, टेक्सेव्ही मेकॅनिकल, शेलारवस्ती, चिखली या सहा कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबतच्या तक्रारी महापालिकेस प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी जलनिःसारण विभागांच्या कर्मचाऱ्यांनी चिखली परिसरात पाहणी केली. यात इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडणाऱ्या सहा कंपन्या आढळून आल्या. सांडपाणी व रासायनिक सांडपाणी विनापरवाना महानगरपालिकेच्या ड्रेनेज लाइनला जोडल्याबद्दल चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार या व्यावसायिकांच्या विरोधात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १८६ (१) (क) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महापालिकेच्या ड्रेनेज लाइनमधून गळती होत असलेली ठिकाणे शोधून दुरुस्ती करण्याचे काम जलनि:सारण विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे. महापालिकेच्या ड्रेनेज लाइनला कोणत्याही कंपनीचे ड्रेनेज कनेक्शन करण्यापूर्वी नोंदणीकृत प्लंबरच्या मार्फत नागरी सुविधा केंद्रामध्ये परवानगी घेणे आवश्यक आहे. महापालिकेच्या ड्रेनेज लाइनमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणे बेकायदेशीर आहे. परंतु हे उद्योजक पर्यावरण कायद्यान्वये सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते महापालिकेच्या ड्रेनेजलाईनमध्ये अनधिकृतरित्या सोडत असल्याबद्दल पर्यावरण कायद्याच्या अनुषंगाने नोटिसा देण्यात आल्या आहेत.
इंद्रायणी ही केवळ नदी नसून तीचे अध्यात्मिक महत्व आहे. याच इंद्रायणीतीरी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांनी तपश्चर्या केली. भगवंत विठूरायाला प्राप्त केले. समाजाला तेजातून तीमिराकडे नेले. समाज प्रबोधन केले. परंतु, आज तिला मलीन करण्यात येत आहे. इंद्रायणी दुषित होतेय. इंद्रायणी थडीसारखे भव्य दिव्य सोहळे नकोत; तिच्या संवर्धनासाठी कायमची दूरदृष्टी हवी आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करू पाहत आहेत.