- सर्वच स्तरातून होतेय टीका अनं निषेध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२२) :- बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज आता आणखी एक नव्या वादात सापडल्याचे दिसत आहे. त्यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल एक जाहीर व्याख्यानात वादग्रस्त वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे. यावर आता सर्वच स्तरातून टीका सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यावर संताप व्यक्त करत, शिंदे-फडणवीस सरकारवरही निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या या विधानाचा निषेध आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
धीरेंद्र कृष्ण महाराजांचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते संत तुकाराम महाराज यांच्याविषयी “ संत तुकाराम महाराष्ट्राचे एक असे महात्मा ज्यांची पत्नी त्यांना रोज काठीने मारत होती. कुणीतरी त्यांना विचारलं की तुम्ही पत्नीकडून मार खातात, तुम्हाला लाज वाटत नाही का? यावर संत तुकाराम म्हणाले की देवाची कृपा आहे की मला मारणारी पत्नी मिळाली. यावर त्या व्यक्तीने विचारले की यामध्ये देवाची कृपा काय? तर संत तुकाराम म्हणाले, जर प्रेम करणारी पत्नी मिळाली असती, तर मी देवावर प्रेम केलं नसतं, पत्नीच्याच नादात अडकलो असतो. मारणारी पत्नी मिळाली तर ती संधी तरी देतेय की, माझ्या नादात कुठे अडकलास जा प्रभू रामाच्या चरणी जा, ” असे बोलताना दिसत आहेत.