- आरोपींवर भारतीय हत्यार कायदा अन्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दि. २४ जानेवारी ते दि. ६ फेब्रुवारी २०२३ अखेरपर्यंत लाठया, काठया, चाकु, सुरे, भाले, सोटे यासारखी घातक शस्त्रे जवळ बाळगण्यास मनाई केली आहे, असे असताना आदेशाचा भंग करुन चिंचवड, आळंदी परिसरात तिघांनी गावठी बनावटीचे पिस्टल व एक काडतुस स्वतःजवळ बाळगले. त्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
पहिल्या कारवाईत आरोपीने गावठी बनावटीचे पिस्टल व एक काडतुस स्वतःजवळ बाळगले. चिंचवड पोलिसांनी (दि. ३०) रोजी रात्री ८.३० वा. चे सुमारास श्री मोरया कृपा बिल्डींग समोर, श्रीधरनगर, रेल्वे पटरी लगत कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३५७०० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. आरोपी रोहित ऊर्फ येशू दत्ता धावारे (वय १९ वर्षे, धंदा-बिगारी, रा. कूपर कोपरा, पिंपळाच्या झाडाजवळ, आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चिंचवड पोलिसांनी आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीसकायदाकलम ३७ (१) (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
आळंदीतील आवारे हॉस्पीटलजवळ (दि. ३०) रात्री ८.४० वाजेच्या सुमारास आरोपीजवळ कोणताही कायदेशीर परवाना नसताना अवैधरित्या स्वतःजवळ लोखंडी पिस्टल आणि जिवंत काडतूस (राऊंड) बाळगले. आळंदी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. विष्णु आनंदा नरवडे (वय २२ वर्षे रा. मरकळ रोड, संतोषी माता मंदिराचे पाठीमागे, आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ नुसार आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचवडगांव येथील श्री स्वामी समर्थ हौसिंग सोसायटीशेजारी नदीपात्रालगतच्या रस्त्यावरील ब्रीजवर आरोपीने अवैधरित्या स्वतःजवळ गावठी बनावटीचे पिस्टल आणि काडतूस बाळगले. चिंचवड पोलिसांनी आरोपीला (दि. २९) रोजी रात्री १०.१५ वा. चे सुमारास ताब्यात घेतले. त्याच्याकडून चौतीस हजार सातशे रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. अजय शंकर राठोड (वय, धंदा बिगारी रा. पांडवनगर वस्ती, ओम मेडीकल शेजारी, पाषाण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ नुसार आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.












