- दिवंगत आ. लक्ष्मण जगताप यांच्यासोबत भाजपचे स्वार्थी राजकारण..
- अजित पवारांची भाजपच्या कारभारावर टीका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क ‘
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२३) :- ” चिंचवडच्या पोट निवडणूकीत भावनिक मुद्द्याचं कारण नाही. तुम्हालाही माहित आहे. ज्या व्यक्तीचं दुःखद निधन झालं. त्या व्यक्तीला राजकारणात मी ताकद दिली. नगरसेवक, स्थायी अध्यक्ष, महापौर, पक्षाचा अध्यक्ष, विधान परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषद सदस्य, विधानसभेवर अपक्ष आमदार म्हणून ते निवडून आले. प्रत्येकाला बाबासाहेबांच्या संविधानानुसार व्यक्ती आणि विचार स्वातंत्र्य आहे. सगळ्यांना सारखा अधिकार आहे. आम्हाला ते सोडून गेले’ तरी आम्ही आकस ठेवला नाही. उलट दवाखान्यात असताना मला वेगळं सांगण्यात आलं. मी ताबडतोब फोन करून काही इंजेक्शन हवी होती ती उपलब्ध केली. काही का असेना आपला सहकारी पुन्हा काम करायला लागला, असे वाल्हेकरवाडीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, भाजपने केवढा स्वार्थीपणा केला. वास्तविक मुक्ताताई आणि लक्ष्मण एवढे आजारी होते; परंतु यांच्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीसाठ थेट अम्ब्युलन्स करून त्यांना तिकडे नेले. एवढे काय नडलेलं होतं. एक दोन मतं कमी झाली असती तर काय आकाश पातळ पडलं नसतं; उलट ती दगदग त्यांना सहन होत नव्हती. पण पक्षासाठी गप बसले. एवढ्या मनाचा मोठेपणा दिलदारपणा यांनी दाखविला. भाजपने निवडणुकीपेक्षा तुमचा जीव आणि आरोग्य महत्वाचं आहे हे त्यांना सांगितलं नाही.
पिंपरी, चिंचवड आणि भोसरीत भाजप पूर्वी नव्हताच. मागच्या निवडणुका काढा; अनेक निवडणुकीत त्यांचे दोन, तीन आणि चार नगरसेवकांपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले नव्हते, पण तोडफोडीचे राजकारण त्यांनी केलं. पक्षांतर बंदी कायद्याला तिलांजली दिली. आजही सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगासमोर केस आहे. निकाल दुर्दैवाने लागत नाही, असेही पवार म्हणाले.


















