- शिंदे गटावर तोंडसुख; मात्र, शहर भाजपच्या भ्रष्ट कारभारावर चकार शब्दही नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क ‘
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२३) :- ‘ ही निवडणूक काटे की नाही काटे से टक्कर है, येथील उत्साह खरा आहे. आपली कुठलीही बैठक ही गद्दार गॅंग एवढी छोटी कधीच असू शकत नाही, कारण जनता जनार्दन आपल्या सोबत आहे. राज्यातील हे सरकार घटनाबाह्य, अल्पायु आहे, ते कोसळणारच आहे. हे तुम्ही लिहून घ्या. पन्नास खोके आणि एकदम ओके, असे आरोप त्यांच्यावर होतात. आम्ही शपथ घेऊन सांगतो आम्ही कधीही खोक्याला हात लावला नाही. मात्र, त्या चाळीस गद्दार आमदार आणि १३ खासदारांपैकी एकजण तरी आम्ही खोक्याला हात लावला नाही असे म्हणालेत? आपलेच कार्यकर्ते त्यांच्या सभेत जाऊन जाब विचारतात तेव्हा त्यांच्या मागे पोलिसांना पाठविले जाते लाठीचार्ज केला जातो धाड पडते. त्यांच्या विरोधात रोष आणि चीड निर्माण झाली आहे, असे मत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले.
ते म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या पाठीत चाळीस वार आणि खंजीर खुपसले गेले तसा प्रकार याआधी महाराष्ट्रात घडला नाही. ही गद्दारी कोणालाही पटलेली नाही. आजवर अनेकांनी त्यांचे पक्ष, राजकीय विचारसरणी बदलली असली तरी ते त्यांची आमदारकी आणि खासदारकीचा राजीनाम देऊन दुसऱ्या पक्षात गेले. निवडणुकीला सामोरे गेले. हरले असतील तर कार्यकर्ते म्हणून पुन्हा कामाला लागले. पण असा जो निर्लज्जपणा, घाणेरडे राजकारण मी तरी माझ्या आयुष्यात कधी बघितले नाही. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही. म्हणून म्हणूनच आमच्या सभेला गर्दी असते. कारण अजूनही लोकांमध्ये विश्वास हा महाविकास आघाडीवर ठामपणे बसलेला आहे.
आमच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला खुर्च्यांची गर्दी असते. महाविकास आघाडी ही खुर्च्यासाठी नव्हते तर जनतेच्या विकासासाठी एकत्र आली. भाजपने राज्याची प्रगती थांबविली. गद्दार पुढे आणून आमचे सरकार पाडले. साडे हजार चौदा कोटींची मदत कोरोना काळात शेतकऱ्यांना आमच्या सरकारने केली. साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक केली. वेदांता प्रकल्पाला सवलती दिल्या. तळेगावात येणाऱ्या प्रकल्पातून रोजगार आणि गुतंवणूक होणार होती; तो गुजरातला पळविला. राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात पाठविले. कृषी आणि उद्योग क्षेत्राचा सरकारवर विश्वास नाही. ही निवडणूक म्हणजे गढूळ राजकारणाविरुद्ध मोठा लढा असणार आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निकालाप्रमाणेच पोट निवडणुकांचे निकाल येणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप मागे राहणार आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.


















