न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च) :- अत्यंत प्रतिकुल परस्थितीत शिक्षण घेऊन एमपीएससी पीएसआय स्पर्धा परिक्षेत राज्यात ४२ वी आलेली कु. स्वाती अच्युत धोंगडे हीचा खादी व ग्राम विकास मंडळ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हेमंत तापकीर यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.
कु. स्वाती हिचे वडील अच्युत पांडुरंग धोंगडे पीएमपीएमलमध्ये ठेकेदारी पध्दतीने ड्रायव्हर म्हणून कामाला आहेत. तसेच आई मीरा अच्युत धोंगडे लोकांच्या घरी धुणी-भांडी व घरकाम करते. भाऊ विलास अच्युत धोंगडे खाजगी कंपनीत ड्रायव्हर म्हणून कामाला आहे. तसेच ती रहाटणी-श्रीनगर येथे १०x१० च्या खोलीत भाड्याने राहत आहे.
अडाणीपणाचा अंधार नाकारुन ज्ञानप्रकाशाला जीवनाचे ध्येय बनविण्या-या स्वाती धोंगडे हीने प्रतिकुल परिस्थितीवर मात करत उत्तम यश संपादित केले आहे. समाजापुढे व युवा पिढीसमोर एक नवा आदर्श व प्रेरणा निर्माण केली आहे, असे हेमंत तापकीर यांनी स्वाती हीच्या यशाबद्दल उद्गार काढले.
सत्कारप्रसंगी खादी व ग्राम विकास मंडळ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हेमंत तापकीर, नगरसेविका सुनिता हेमंत तापकीर, नगरसेवक चंद्रकांत नखाते, राज तापकीर, अध्यक्ष चिंचवड़ विधानसभा भाजपा युवा मोर्चा, हरेश तापकीर, उपाध्यक्ष भाजपा पिं चिं शहर, नागरिक व आदी उपस्थित होते.











