- नाना काटे यांचा विजय निश्चित असल्याचे शरद पवार यांचे निरीक्षण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२३) :- देशातील यापुढील प्रत्येक निवडणुकीत परिवर्तन झालेले पाहायला मिळेल. जनता बेकारी आणि महागाईच्या मुद्द्यांनी त्रस्त झाली आहे. जनता परिवर्तनाला अनुकूल भूमिका घेईल. त्यामुळे नाना काटे यांचा विजय निश्चित असल्याचे निरीक्षण राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी नोंदवले.
रहाटणी येथे पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी पोटनिवडणूक, पक्षाची राजकीय भूमिका, पिंपरी चिंचवडचा विकास आणि देशातील अराजकाच्या भूमिकेवर परखड भाष्य केले. यावेळी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे, प्रदेश युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख, आमदार निलेश लंके, अतुल बेनके, अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सचिन भोसले, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, योगेश बहल, संजोग वाघेरे, प्रशांत शितोळे, मंगला कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यापूर्वी देशात काँग्रेस, समाजवादी पक्षात फूट पडली. पण अख्खा पक्ष चिन्हासकट एखाद्या गटाच्या झोळीत टाकण्याचा प्रयत्न यापूर्वी कधीच झाला नव्हता. त्यामुळे निवडणूक आयोगाला काही मार्गदर्शन झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. मी महाराष्ट्रात फिरत आहे. नेते जरी शिंदे यांच्यासह गेले असले तरी सामान्य कट्टर शिवसैनिक मात्र उध्दव ठाकरे यांच्यासोबत आहे. याची माहिती मी घेतली आहे.
सत्तेचा गैरवापर करून शिवसेना फुटली, राजकीय पक्ष हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला. तांत्रिक मुद्दयांचा बागूलबुवा करत लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोक त्यांना धडा शिकवल्याखेरीज राहणार नाहीत. सध्या हा निर्णय न्यायालयाच्या कक्षेत आहे. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. त्यावर मी अधिक भाष्य करणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
गिरीश बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी त्यांची भेट घेतली. त्यांच्या जवळ पाच दहा मिनिटे थांबलो. त्यांच्या प्रकृतीवर ताण पडू नये म्हणून मी फार वेळ थांबलो नाही, असे सांगून अप्रत्यक्षपणे त्यांनी भाजपकडून त्यांना प्रचारासाठी उतरवण्याच्या कृतीचा निषेध नोंदवला. ही बाब माझ्यापेक्षा अधिक चांगलेपणाने एकनाथजी खडसे सांगतील, असे सांगून खडसे यांच्याकडे माईक सोपवला.
त्यावेळी खडसे म्हणाले, त्या पक्षाचे मी ४२-४५ वर्ष कार्य केले आहे. पण अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या काळातील भाजपामध्ये असे प्रकार घडत नव्हते.
पुढे बोलताना पवार म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी देशभरातील नेते गर्दी करत आहेत. पण नेत्यांच्या गर्दीने निवडणूक जिंकता येत नाहीत. नेत्यांच्या गर्दीत जनसामान्यांचा सहभाग किती हे महत्वाचे आहे. नेत्यांच्या गर्दीऐवजी निवडक शिलेदारांच्या मदतीने निवडणूक जिंकता येते. मी १४ निवडणुका लढवल्या यात एक दोन वेळाच प्रचारासाठी मला जावे लागले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. खरे तर पोटनिवडणुकीच्या प्रचाराला मी सहसा जात नाही. पण या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीत्व मी केले आहे. यानिमित्त जनतेत मिसळता येईल. त्यांच्या भावना जाणून घेता येतील. जुन्या गाठीभेटी होतील या हेतूने मी येथे आलो असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. संजय राऊत आणि अशोक चव्हाण यांच्या जीविताला धोका असल्याचे त्यांनी सांगितले. कायदा आणि सुव्यवस्था पाहणाऱ्या लोकांनी त्याचा विचार केला पाहिजे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. आपल्या विरोधी विचारांच्या नागरिकांना देशद्रोही ठरवण्याचा अनिष्ट पायंडा पाडला जात आहे. प्राध्यापक म्हणून आयुष्यभर काम करणाऱ्यांना, सामान्य आदिवासींचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना देशद्रोही ठरवण्याचे प्रयत्न केले जात असल्याबद्दल पवारांनी चिंता व्यक्त केली.













