न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२३) :- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग हडपसरपासून मोहोळपर्यंत असा २३४ किमी रस्ता विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण आणि दोन्ही बाजूला वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आला आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सासवड, निरा, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस, पंढरपूर या ठिकाणी बाह्यवळण रस्ते प्रस्तावित केले आहेत. आळंदी आणि देहू ते पंढरपूर महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी हवाई पाहणी केली. चौपदरीकरण झालेला हा मार्ग ‘हरित भक्ती मार्ग’ करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा १३० किमी लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस, बारामती, इंदापूर, अकलूज, बोंडले पर्यंत विकसित करण्यात येत आहे. दोन्ही मार्गांवरील पालखी विसाव्याच्या स्थळांवर वारकऱ्यांच्या सोयीसाठी या सर्व ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी या सुविधांसह सौंदर्यीकरण केले जाणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग पाच टप्प्यांमध्ये पुढील वर्षीच्या जानेवारीपर्यंत विकसित होत आहे. मोहोळ ते वाखरी भागाचे ९१ टक्के, वाखरी ते खुडूस भागाचे ९७ टक्के, खुडूस ते धर्मपुरी भागाचे ८८ टक्के, धर्मपुरी ते लोणंद ४८ टक्के आणि लोणंद ते दिवे घाट भागाचे २० टक्के काम झाले आहे. दिवे घाट ते हडपसर भागाच्या विकसनाचा टप्पा अद्याप निविदा प्रक्रियेमध्ये आहे. एखादा टप्पा भूमी संपादनाच्या अभावी लांबू शकतो, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.


















