न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच कोल्हे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की, शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणाला संधी दिली. त्याबद्दल मी पक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे मनापासून आभार मानतो.
मला उमेदवारी जाहीर झाल्याने निवडणूक सोपी झाली आहे. अस विरोधकांना वाटते. परंतु, कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला कमी लेखण ही माझी संस्कृती नसल्याच मी नम्रतापूर्वक सांगू इच्छितो. त्यातच ही निवडणूक कुणा व्यक्तीची राहिली नसून जनतेची झाली आहे. कारण, गेल्या पाच वर्षात मतदार संघातील जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे.
सर्वसामान्य जनता तासनतास वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली आहे. महागाईमध्ये भरडली आहे. बैलगाडी शर्यतीवरील न हटलेली बंदी, शेत मालाचे कोसळलेले दर, शिवनेरी आणि वढू तुळापूर येथील ऐतिहासिक ठेव्याचा रखडलेला विकास, खेळाडूंसाठी प्रशिक्षण केंद्र झालेली नाहीत. पर्यटन केंद्राचा विकास झाला नाही. असे अनेक प्रलंबित प्रश्न घेऊन आता जनताच निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. त्यामुळे ही निवडणूक कोणा व्यक्तीची नाही. ही निवडणूक मतदार संघातील बेरोजगार तरुण, अपेक्षाभंग झालेल्या शेतक-यांची आहे.











