न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२३) :- पिंपरीतील इंदिरा गांधी उडाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्तीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. संथ गतीने हे काम सुरू असल्याने वाहनचालक व पादचारी संताप व्यक्त करीत आहेत. पुलाच्या दुरुस्ती कामासाठी पुलाखालील २५ झोपड्यांचे भाटनगर येथे तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार आहे.
पुणे-लोणावळा रेल्वेमार्गावरील हा उडाणपूल आहे. शहरातील हा पहिला उडाणपूल आहे. या पुलाचे बांधकाम धोकादायक झाल्याने पालिकेने त्यांचे पिलर स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले. त्यात पूल धोकादायक झाल्याचा अहवाल आहे. पुलाच्या मजबुतीकरणासाठी पालिकेकडून दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे. काम सुरू होऊन २ वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला तरी, ते संथगतीने सुरू आहे.
आता, पुलाखालील पिलर व इतर काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी तेथील २५ झोपड्यांचे तात्पुरत्या स्वरूपात भाटनगर येथे स्थलांतर करण्यात येणार आहे. त्या झोपड्यांना महावितरणकडून वीजजोड देण्यात येणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात वीज जोड घेणे व सुरक्षा ठेव यासाठी एकूण ५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. झोपड्यांचे स्थलांतर केल्यानंतर तेथील व इतर बांधकामांचे मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


















