न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २० मार्च) :- युनिक व्हिजन स्कूलमध्ये विद्यार्थी आणि पालक यांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी ‘शैक्षणिक मार्गदर्शन कक्षा’ची (Education Bureau) स्थापना करण्यात आली आहे. या शैक्षणिक मार्गदर्शन कक्षा अंतर्गत सर्व पालकांकरिता, रविवार (ता. २४ मार्च) रोजी, सायं.५ वाजता, ‘शाळा-आई-बाबांची’(Life Changing Parenting Workshop) या कार्यक्रमाचे युनिक व्हिजन स्कूलमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी एज्युकेशनल लाईफ कोच डॉ. भगवान गाडे उपस्थितांना मार्गदर्शन करणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून निवेदिता देसाई (ज्ञान प्रबोधिनी, पुणे) उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये आई-बाबांची पालकत्वाची भूमिका, मुलांच्या भावना, लाड व शिस्त यांचा मेळ कसा घालावा, तसेच शिक्षण, संस्कार, खेळ, परिपक्वता व व्यक्तिमत्व विकास यांचा ताळमेळ कसा राखावा, पालक-विद्यार्थी संवाद आंतरक्रिया व घरातील वातावरण, पाल्याचे उत्तम करिअर कसे घडवावे, तसेच आजच्या स्पर्धात्मक युगात पालकांना भेडसावणाऱ्या असंख्य प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात येईल.
चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी रोड येथील युनिक व्हिजन इंग्लिश मिडियम स्कूल येथे होणारी सदर कार्यशाळा सर्व पालकांसाठी विनामुल्य असून, जास्तीत जास्त पालकांनी याचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी, मुख्याध्यापिका, रजनी दुवेदी, युनिक व्हिजन इंग्लिश मेडियम स्कूल, चिंचवडेनगर, चिंचवड पुणे-३३. मो. ७७१९०९२९२९, ७७४१८६२९२९ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन स्कूलमार्फत करण्यात आले आहे.











