- चार्जिंग स्टेशनची निर्मिती करणाऱ्यास मिळकतकरात २ ते ५ टक्के सूट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिका इलेक्ट्रिक वाहने वापरणाऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांचा अधिक वापर होण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी पालिकेच्या कर संकलन विभागाने पुढाकार घेतला आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या मिळकतधारकांना किंवा हाऊसिंग सोसायटीला मिळकतकरात २ ते ५ टक्के अशी सूट आहे. त्या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा चार्जिंग प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने २० ऑगस्ट २०२१ ला इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर करून महापालिकांना या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची पालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी १ जानेवारी २०२२ ला अंमलबजावणी करण्याचे आदेश कर संकलन विभागाला दिले होते, अशी माहिती सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली. त्यानुसार इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्टेशन उभारणाऱ्या मिळकतधारकांना २ टक्के आणि हाऊसिंग सोसायटीला त्यांच्या सामायिक मालमत्ता जसे की जीम, क्लब हाऊसला ५ टक्क्यांची सवलत असणार आहे.
वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचा इलेक्ट्रिक वाहने वापरण्याकडे कल वाढला आहे. या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या मिळकतधारकांना किंवा हाऊसिंग सोसायट्यांना २ ते ५ टक्के मिळकतकरात सवलत जाहीर केली आहे. या सवलतीसाठी ऑनलाईन तसेच, ऑफलाईन अर्ज करता येईल, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
शहराची लोकसंख्या वाढत असताना शहर चारही बाजूने वाढत आहे. त्यामुळे शहरातील वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयाकडे (आरटीओ) २३ लाख ९२ हजार ५२१ वाहनांची नोंद असून शहराची लोकसंख्या ३० लाखांवर आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येचा आलेख दिसून येत आहे. दुसरीकडे वाहनांची संख्या सातत्याने वाढत असतानाच पेट्रोल व डिझेलच्या वाहनांमुळे प्रदुषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली आहे.
स्वतःच्या इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास व त्यातून इतर इलेक्ट्रिक वाहनधारकांना चार्जिंगची सुविधा उपलब्ध केल्यास मिळकतकरात २ टक्के सवलत मिळणार आहे. हाऊसिंग सोसायटीमध्ये सामायिक सुविधांतर्गत सदस्यांना इलेक्ट्रीक वाहन चार्जिंगची सुविधा उपलब्ध केल्यास मिळकतकरात ५ टक्के सवलत आहे. हाऊसिंग सोसायटीने त्यांच्या मालकीच्या जागेत व्यापारी तत्वावर इलेक्ट्रीक वाहन चार्जिंगची सुविधा, मूळ पार्किंग वगळता अन्य मोकळ्या जागेत केल्यास, मात्र त्यामुळे आपत्कालीन कामाकरिता ती जागा अडचणीची असू नये, असे सांगितले आहे. मोकळ्या जागेचा वापर व्यापारी कारणाकरिता होणार असला, तरी त्या जागेकरिता व्यापारी दराने मिळकतरकराची आकारणी न करता, ती घरगुती दराने करण्यात येणार आहे.















