न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२३) :- महापालिकेच्या सिद्धी प्रकल्पां’तर्गत करआकारणी व करसंकलन विभागाचे मिळकतकराची बिले महिलांमार्फत वाटप केले जात आहेत. अवघ्या १२ दिवसात त्यांनी दोन लाखांवर बिलांचे वितरण केले असून महापालिकेने तयार केलेल्या ॲप्लिकेशनद्वारे मिळकतधारकांचा पर्यायी पत्ता, मोबाईल क्रमांक अपडेट करण्यात येत आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना मिळकतकराची बिले वाटपाचे काम दिले आहे. महिलांना रोजगार उपलब्ध करून त्यांची आर्थिक उन्नती करण्याचे उद्दिष्ट आहे. करसंकलन विभागाच्या ॲप्लिकेशनद्वारे मिळकतींचे अक्षांश व रेखांश ठिकाण, छायाचित्र घेऊन ‘जिओ टॅग’ केले जात आहे. त्यामुळे भविष्यात मिळकती शोधण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तसेच, मिळकतधारकांचे संपर्क क्रमांक व पत्ते अपडेट केले जात आहेत. शिवाय, दहा हजार जणांचे पर्यायी संपर्क क्रमांक व पर्यायी पत्ते प्राप्त झाले आहेत. महापालिकेकडे नोंद असलेल्या तीन हजारावर मालमत्ता आढळून आल्या नाहीत. त्या दुबार असणे, अस्तित्वात नसणे, भूसंपादन झालेल्या असू शकतात, त्या नोंदणीतून कमी करण्याचे काम वर्षभरात केले जाणार असल्याचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.
महिला सक्षमीकरण व करसंकलन विभागाच्या माहितीचे शुद्धीकरण अशी दोन महत्त्वाची उद्दिष्टे ठेवून ‘सिद्धी प्रकल्प’ हाती घेतला आहे. ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होताना दिसत आहेत. स्थानिक महिलांना बिले वाटपाचे काम दिले आहे. यातून त्यांना शहराच्या स्थानिक भागाची सखोल माहिती होत आहे. याचा भविष्यात विविध योजनांसाठी कसा उपयोग करून घेता येईल? यावर काम चालू आहे. यातून सिद्धी प्रकल्प नवीन उंचीवर नेण्यात येईल.
– शेखर सिंह, प्रशासक, महापालिका
















