न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२३) :- घरगुती वापराच्या सिलबंद गॅस सिलेंडरमधुन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या पाईप सर्किटच्या सहाय्याने कोणतीही खबरदारी न घेता रिकाम्या ४ किलोच्या छोटया गॅस टाक्यांमध्ये बेकायदेशिरपणे गॅस रिफील करुन त्या टाक्या जादा दराने विकत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट २ च्या पोलिसांना मिळाली. एकाच परिसरात दोन ठिकाणी कारवाया करून तिघांना अटक केली आहे. तसेच दोन्ही कारवाईत एकुण १,५०,२२५ रुपये कींमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये एकुण ४३ घरगुती वापराचे विविध कंपनीचे सिलेंडर, ०३ व्यवसायिक वापराचे सिलेंडर, २६ छोटे ०४ कीलोचे सिलेंडर असे एकुण ७२ विविध कंपनीचे गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. तसेच तिघांच्या विरुध्द वाकड पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम २८५, २८६ सह जिवनावश्यक वस्तुचा कायदा १९५५ चे कलम ३, ७ सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन १९०८ चे कलम ५ अन्वये ०२ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
पहिल्या कारवाईत पोलीस पथकाने पदमजी पेपर मिलजवळ, थेरगावच्या आर्या गॅस सर्व्हिस, सदाशिव कॉलनी, साने चाळ या दुकानावर छापा मारला. दोघे सिलबंद घरगुती गॅस सिलेंडरमधुन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या लोखंडी रिफील पाईप सर्किटच्या सहाय्याने दुसऱ्या रिकाम्या ४ कीलोच्या टाक्यांमध्ये गॅस रिफील करीत असताना आढळले.
पोलिसांनी विष्णु ज्योतीराम सुतार (वय २४ वर्षे रा. सदाशिव कॉलनी, साने चाळ, पदमजी पेपर मिल जवळ थेरगाव, मुळगाव मु. पो. विजयनगर, हनुमान मंदिरा शेजारी, ता. देवणी जि. लातुर), अतुल श्रीहरी पांचाळ (वय २५ वर्षे रा. सदाशिव कॉलनी, साने चाळ, पदमजी पेपर मिल जवळ थेरगाव, पुणे. मु. पो. कोहळनुर ता. जळकोट जि. लातूर) यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्या ताब्यातुन ७८,७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये २१ घरगुती वापराचे गॅस भरलेले विविध कंपनीचे सिलेंडर, १ घरगुती वापराचे रिकामे सिलेंडर, १ घरगुती वापराचे अर्धा गॅस काढलेली टाकी, १ व्यावसायीक वापराचे रिकामे सिलेंडर, ५ लहान सिलेंडर, १ लहान पितळी रिफिलर, १ लोखंडी रिफील पाईप, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, गॅस रीफिलिंग करीता वापरात येणारे एक गॅस रिफिलिंग सर्किट त्यास रबरी पाईप असलेले व दोन्ही बाजुस सिलेंडरला बसणारे पितळी व स्टिलचे कॉक व त्याच्यावर लाल रंगाचे फिरवण्याचे बटण, २ लोखंडी अॅडजेस्टेबल पान्हे असे साहित्य पोलिसांनी जप्त केले.
दरम्यान दुसऱ्या कारवाईत सदाशिव कॉलनी, पदमजी पेपर मिल जवळ थेरगाव येथे एका रुममध्ये अवैधरित्या पाईप सर्किटच्या सहाय्याने कोणतीही खबरदारी न घेता रिकाम्या ४ किलोच्या छोटया गॅस टाक्यांमध्ये बेकायदेशिरपणे गॅस रिफील करताना एकाला जेरबंद केले.
जयराम सर्जेराव चौधरी (वय २२ वर्षे रा. देवा मेटकरी यांची रूम लमाण तांडा नेन्हे दत्तवाडी ता. मुळशी जि. पुणे. मुळगाव- मु. कुंभारी, पो. बाघी बोबडे ता. जिंतुर जि. परभणी) याला ताब्यात घेतले. कारवाईत ९ घरगुती वापराचे गॅस भरलेले असलेले सिलेंडर, ११ घरगुती वापराचे रिकामे विविध कंपनीचे सिलेंडर, विविध कंपनीचे ०२ व्यावसायीक वापराचे रिकामे सिलेंडर, ११ भरलेले लहान सिलेंडर, १० रीकामे लहान सिलेंडर, ०२ पितळी रीफीलर नोजल, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, ०१ लोखंडी अॅडजेस्टेबल पान्हा असे ७१,५२५ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.
ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने, पोलीस अंमलदार देवा राऊत, जयवंत राऊत, संतोष इंगळे, सागर अवसरे यांनी केली आहे.
















