न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. :- श्री साई सत्चरित्र चित्ररुपाने साकारुन आंतरराष्ट्रीय स्थरावर पोहचविणारे प्रसिध्द चित्रकार सुनील शेगांवकर यांनी काढलेल्या खजूराहो येथील चित्रांचे प्रदर्शन न्युयॉर्कमध्ये ‘आर्ट एक्स्पो’ येथे भरविण्यात येणार आहे. या आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनात आपली चित्रकला सादर करण्याची संधी मिळणारे शेगांवकर हे पिंपरी चिंचवड मधील पहिलेच चित्रकार आहेत. वास्तववादी, अमूर्त आणि समकालीन चित्रे रेखाटण्यात शेगांवकर पारंगत आहेत, अशी माहिती ‘कलारंग’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
आतापर्यंत शेगांवकर यांनी श्री साई बाबांच्या जीवनावर आधारीत शंभरांहून जास्त पाच फुट बाय आठ फूट कॅनव्हासवर शेकडो चित्रे साकारली आहेत. परंतू यावेळी त्यांनी ‘खजूराहो’ येथील शिल्पकलेचा, मुर्त्यांचा सखोल अभ्यास व निरीक्षण करुन कॅनव्हासवर त्यांच्या हुबेहुब प्रतिमा साकारल्या आहेत. १० व्या शतकात भारतीय शिल्पकला किती प्रगत व उच्चस्थरावर होती हे त्यांच्या चित्रांतून त्यांनी दाखविले आहे. न्युयॉर्क येथे आर्ट एक्स्पोमध्ये दि. ४ एप्रिल ते ७ एप्रिल पर्यंत भरणा-या या प्रदर्शनास जागतिक स्थरावरील लाखों चित्रकार व कलाप्रेमी भेट देणार आहेत.
‘खजूराहो’ ची शिल्पकला म्हटले की, फक्त नग्न कामुक मुर्ती असाच समज सर्व सामान्यांचा आहे. परंतू भारतीय समाज दहाव्या शतकात सामाजिक दृष्ट्या चित्रकला, शिल्पकला यामध्ये किती प्रगत होता हे यातून दिसते. भारताची हि देदीप्यमान संस्कृती इतिहास, भारतीय लोकांचा कलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन पाश्चिमात्य नागरीकांपुढे सादर करण्याचा प्रयत्न या चित्रप्रदर्शनामागे आहे असे, सुनील शेगांवकर यांनी सांगितले.
शेगांवकर यांनी यापुर्वी साकारलेली साई बाबांची चित्रे शिर्डीमधील साई मंदिरात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योजक बाबा कल्याणी, रामोजी राव, महेश मांजरेकर, सलमान खान, सचिन तेंडूलकर यांनी आपल्या घरात लावलेली आहेत. तसेच अमेरीका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिगांपूर मधील साई मंदिरातही लावण्यात आली आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्वातंत्र्यवीर सावरकर, स्व. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे यांची तैलचित्रे आणि प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात संगित, नाटक, लोककला या विषयांवरील शेगांवकर यांनी काढलेली चित्रे लावण्यात आली आहेत. आगामी काळात महाराष्ट्राची परंपरा लोकजीवन, सण, उत्सव, संस्कृतिक वारसा, कला, क्रिडा या विषयांवर वास्तववादी शंभर चित्रांची मालिका साकारण्याचे ध्येय आहे. तसा प्रस्ताव शेगांवकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडे दिला आहे.










