न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च) :- हिंजवडी – जांबे येथिल विटभट्टीवरील मातंग समाजाचा मजूर त्याच्या कुटुंबासह जेवण करून, बसल्याचा राग मनात धरून, मजुराला बेदम मारहाण करत, मानवी विष्ठा खाण्यास भाग पडल्याची संतापजनक घटना हिंजवडी जांबे गावात घडली आहे.
याबाबत शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष तथा लहुजी शक्तासेना पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख युवराज भगवान दाखले व सकल मातंग समाज पुणे व सकल मातंग समाज पिंपरी-चिंचवड यांनी पोलीस आयुक्त पज्ञनाभन यांच्याकडे आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.
या मागणीची भारत सरकारच्या राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाने दखल घेतली आहे. याबाबत राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाचे निदेशक डॉ. बेडेकर यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पज्ञनाभन, राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक तसेच जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना पत्र पाठविले आहे.
यात आयोगाने प्रशासनावर कडक ताशेरे ओढले आहेत. तसेच गुन्हा दाखल करण्याबाबत केलेली दिरंगाई व आदी बाबींवर आयोगाने प्रशासनावर नाराजगी जाहीर केली आहे. तसेच संबंधित आरोपी यांची जमानत रद्द करण्यासाठी वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करून, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आठ दिवसात राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाकडे पाठविण्यात यावा, अशा सूचना केल्या आहेत.
या गंभीर प्रकरणासाठी शिवशाही महीला आघाडीच्या भाग्यश्रीताई म्हस्के, सुनिताताई खंडाळकर, शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव गणेश आहेर, गोरख पाटील, बाळासाहेब गायकवाड, मारूती म्हस्के, दत्ता गिरी, मातंग समाजाचे नेते संदिपान झोंबाडे, संतोष जोगदंड, मा नगरसेवक सुभाष जगताप, अमित गोरखे, मनोज तोरडमल, नाना कसबे, भगवान शिंदे, गणेश साठे, संजय ससाने, अरुण जोगदंड, गणेश क्षिरसागर तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले, असे युवराज दाखले यांनी सांगितले आहे.










