न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२३) :- मोशी येथे दही पळस नावाचा एक अतिदुर्मीळ वृक्ष सापडला असून, त्यांच्या पानांवर कोणत्याही टोकदार किंवा टणक वस्तूने लिहिले असता, कधीही लुप्त न होणारी कायमस्वरूपी अक्षरे उमटतात. या वृक्षास दधीपर्ण, दहीमन, दहीपळस किंवा दहीपलाश असेदेखील म्हणतात.
या वृक्षाच्या पानांवर सीतामाई रामाला संदेश लिहित असे म्हणून यास सीतापत्र असेदेखील म्हणतात. भारतात हा वृक्ष राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड येथे आढळतो. पुणे जिल्ह्यातील भामचंद्र, घोराडेश्वर आणि भंडारा डोंगर रांगा मधूनदेखील या वृक्षाची नोंद केलेली आहे, अशी माहिती वनस्पती अभ्यासक किशोर सस्ते यांनी दिली.
याचे वनस्पतीशास्त्रीय नाव कॉर्डिया म्कलिओडी आहे. तो भोकरवर्गीय बोरॅजीनेसी या कुळातील आहे. हा वृक्ष आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ म्हणजेच आययूसीएन रेड लिस्टच्या संकटग्रस्त यादीमध्ये समाविष्ट आहे. हा वृक्ष कर्करोग, पॅरालिसीस (पक्षाघात) या आजारावर उपयुक्त आहे.
पिपरी- चिचवड परिसरातील हा एकमेव दुर्मीळ असा हा वृक्ष आहे. २०१९ साली एका खासगी कंपनीने पिपरी-चिंचवड परिसरातील जैवविविधताअंतर्गत विविध वृक्षांची नोंद केली आहे; परंतु या यादीमध्ये येथील अनेक दुर्मीळ वनस्पतींची नोंदच केली गेलेली नाही. विकासकामे, खाणकाम आणि टेकड्यांची तोडफोड यामुळे या वृक्षांवर वरवंटा आलेला आहे. या वृक्षाचे भविष्यात संगोपन आणि संवर्धन करणे अत्यावश्यक आहे.
– प्रा. किशोर सस्ते, वनस्पती आणि जैवविविधता तज्ज्ञ.
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या पानांचा उल्लेख भूमिगत क्रांतिकारक गुप्त संदेश पाठवण्यासाठी करत असत. या झाडांच्या पानांमार्फत संदेशवहन केले जाते, असा सुगावा इंग्रजांना लागताच त्यांनी हे वृक्ष मोठ्या प्रमाणात तोडले, अशी आख्यायिका आहे. मोशी येथील खाण परिसरातील टेकड्यांवर हा वृक्ष आढळून आला आहे. या आधी याच परिसरातून दही पळसाचे मोठे झाड होते. ते आता नामशेष झाले आहे.














