न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च) :- आगामी मावळ लोकसभा निवडणूक बहुरंगाने व बहुढंगाने चर्चेत आहे. सुरुवातीला मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेना की भाजप या गर्तेत सापडलेला असताना, शिवसेना व भाजपची युती झाली अनं.. मतदार संघ शिवसेनेच्या पदरात पडला. या मतदारसंघावर सुरुवातीला भाजपने दावा दाखल केला होता. जागा वाटपानुसार मावळ मतदार संघ शिवसेनेकडे आला व शिवसेनेने मावळचे उमेदवार म्हणून अपेक्षेप्रमाणे श्रीरंग बारणे यांचे नाव जाहीर केले. यावेळी भाजपच्या वरिष्ठांनी पदाधिकाऱ्यांना युतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले.
मावळ मतदारसंघाचे प्रतिस्पर्धी उमेदवार पार्थ पवार यांनी मात्र, प्रचाराचा शुभारंभ सुरु करून, प्रचारात आघाडी घेतली. शिवसेनेच्या गोटात मात्र शांतताच दिसत होती. युतीचा उमेदवार म्हणून श्रीरंग बारणे यांनी प्रचार सुरु केला असला, तरी शिवसेनेबरोबर भाजप मात्र सामील झालेला नव्हता. याकरीता बारणे आज गुरुवार (दि. २८) रोजी प्रचार मोहिमेवर असताना त्यांचे पूर्वाश्रमीचे कट्टर विरोधक लक्ष्मण जगताप यांची त्यांच्या चन्द्ररंग या निवास्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान बारणे-जगताप यांच्यात आगामी निवडणुकीसंदर्भात गुप्तगू झाले असले तरी, मी युतीचा उमेदवार आहे. या नात्याने मी जगताप यांची भेट घेतली. आमच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे, असे म्हटले आहे.
बारणे यांच्या कृतीने मात्र, शिवसैनिक आचंबित झाले असून, बारणे यांना नाराज कार्यकर्त्यांना भेटायलाही वेळ नाही परंतु, आमदार जगताप यांना भेटायला वेळ आहे. कार्यकर्त्यांना घडविले असते, तर बारणे यांच्यावर अशी वेळच आली नसती, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून समाजमाध्यमात येऊ लागली आहे. तसेच आमदार जगताप व भाजप पदाधिकारी श्रीरंग बारणे यांचे काम मनापासून करणार का? की मागील लोकसभा निवडणुकीत खासदार बारणे यांनी आमदार जगताप यांच्या केलेल्या पराभवाचे उट्टे काढणार, असा प्रश्न जाणकार उपस्थित करीत आहेत.
चिंचवड विधानसभेचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व पक्षातील पदाधिकारी यांना शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना पक्षाने पून्हा उमेदवारी दिल्यास त्यांचे काम करायचे नव्हते. तसेच शिवसेनेकडे लोकसभेसाठी दुसरा कोणी संभाव्य उमेदवारही नसल्यामुळे बारणे यांनाच पून्हा शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत दिसत होते. बारणे यांना विरोध दर्शविण्यासाठी शहर भाजपचे पदाधिकारी यांनी पुण्यात एका कार्यक्रमासाठी नितीन गडकरी आले असता, पदाधिकाऱ्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपला सोडावा, अशी गळ घातली होती. कारण शिवसेनेचे खासदार बारणे यांनी युतीचा धर्म न पाळता, भाजपवर व महापालिकेच्या विविध विकासकामांना लक्ष करीत आरोप-प्रत्यारोप केले होते. यावेळी बारणे यांनी स्वतःहून आपली मान अडकित्त्यात अडकविली असून, अडकित्ता जसा आपला धर्म पाळतो, तसाच धर्म भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पाळल्यास बारणे यांच्या मदतीस धावून येणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही.















