न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च) :- अदानी फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छाग्रह या राष्ट्रीय स्वच्छता उपक्रमांतर्गत केलेल्या भरीव कार्यासाठी तळवडे येथील सरस्वती विश्व विद्यालय नॅशनल स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छाग्रह पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच शाळेचा विद्यार्थी आदर्श चौरसिया याने लिहिलेल्या स्वच्छता निबंधास राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात आले. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला.
यावेळी पुणे मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक, सहाय्यक आयुक्त सुरेश जगताप, शिक्षणाधिकारी शिवाजी दौंडकर यांच्या हस्ते शाळेचा सन्मान व बक्षीस देण्यात आले. शाळेच्या शिक्षिका शुभा नायर व मुक्ता कुलकर्णी यांनी पुरस्कार स्वीकारला. भारत सरकारने सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानातून प्रेरणा घेऊन समाजात स्वच्छतेची जाणीव व जागरूकता निर्माण व्हावी, या हेतूने २०१७-१८ मध्ये तळवडे येथील सरस्वती विश्व विद्यालय नॅशनल स्कूलमध्ये उपक्रम राबविण्यात आला.
शुभा नायर आणि मुक्ता कुलकर्णी या शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली इ. ८ व ९ वी च्या २० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. मुख्याध्यपिका क्षमा गर्गे यांनी वर्षभर दल सदस्यांना प्रेरित केले. दल सदस्यांनी वर्षभर विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची माहिती देणारी चित्रे व पोस्टर बनवले. “सेल्फी के साथ सफाई के सितारे” पथ नाट्य समाजातील स्वच्छतेचा महत्वावर व्हिडिओ पीपीटी सादरीकरण, सफाई कामगारांची घरगुती व कंपनीतील स्वच्छता आणि शाळेतील शौचालय स्वच्छ राखणे, हाताने साबण तयार करणे इत्यादी उपक्रम राबविले.
तसेच सेल्फी विथ सफाई या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या कामाची माहिती घेतली. दल सदस्यांच्या पालकांनी या कार्यक्रमासाठी मुलांना सहकार्य केले. शेवटच्या टप्प्यात सहभागी झालेल्या सदस्यांमध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आली. निबंधात विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले. इ ९ वी च्या आदर्श चौरासिया या सदस्याला राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट निबंध पुरस्कार देण्यात आला एसव्हीव्हीएनएस तळवडे या शाळेसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.











