न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२३) :- “दहावीचे वर्ष हा आयुष्यातील एक निर्णायक टप्पा असतो. आईवडील, गुरुजन, समाज यांच्या अपेक्षा आणि या पार्श्वभूमीवर स्वतःच्या सुप्त क्षमता ओळखून आयुष्य घडवा ” असा संदेश ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी गोविंद गार्डन मंगल कार्यालय, आळंदी रस्ता, भोसरी येथे गुरुवारी विद्यार्थ्यांना दिला.
शारदा क्लासेस आयोजित गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. राजेंद्र हिरेमठ बोलत होते. ह. भ. प. नारायण महाराज जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार महेश लांडगे, माजी नगरसेविका प्रियांका बारसे, अनुराधा गोफणे, माजी नगरसेवक वसंत लोंढे, सागर गवळी, ॲड. सतीश गोरडे, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे, उद्योजक अरुण इंगळे, मधुमेहतज्ज्ञ डॉ. अनू गायकवाड, डॉ. विलास साबळे, डॉ. रोहिदास आल्हाट, डॉ. प्रशांत गादिया, शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती शंकर जांभळकर, करंदी गावाच्या सरपंच सोनाली ढोकले, उपसरपंच पांडुरंग ढोकले, युवा नेते बंटी ढोकले, महात्मा फुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निर्मला माळी, जिजामाता विद्यालय मुख्याध्यापक नीलेश गायकवाड, श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक लालासाहेब जगदाळे आदी मान्यवरांची व्यासपीठावर; तसेच शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.
याप्रसंगी शारदा क्लासेसच्या वतीने राष्ट्रपती सन्मानित ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. राजेंद्र हिरेमठ यांना ह. भ. प. नारायणमहाराज जाधव यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पहिल्या ‘शारदा’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचबरोबर इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गात उल्लेखनीय गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शालोपयोगी साहित्य प्रदान करून सन्मानित करण्यात आले. याशिवाय इयत्ता दहावीत विशेष गुणवत्ता प्राप्त करणारे मानस टापरे (प्रथम क्रमांक), हर्षवर्धन थिटे (द्वितीय क्रमांक) आणि साहिल गावडे (तृतीय क्रमांक) या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना आणि विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना डॉ. राजेंद्र हिरेमठ पुढे म्हणाले की, “विश्वगुरू होण्याकडे भारताची वाटचाल सुरू झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानावर आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे विकासाच्या अन् करिअरच्या अनेक नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षाही चाकोरीबाह्य क्षेत्रांमध्ये असंख्य संधी दडलेल्या आहेत. अंगभूत कलागुण, कौशल्य यांच्या आधारे आयुष्य घडवा. आत्मविश्वास आणि आत्मसन्मान ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी उपयुक्त शिदोरी आहे!” यावेळी सुमारे पाच हजार किलोमीटर सायकल प्रवास करणाऱ्या विशाल कोल्हे या माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आमदार महेश लांडगे यांनी विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना शुभेच्छा दिल्या. माजी नगरसेवक सागर गवळी यांनी आपल्या मनोगतातून, “शारदा क्लासेसच्या कडक शिस्तीमुळे माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडले असून समाजातील विविध क्षेत्रांत हे माजी विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, या गोष्टीचा सार्थ अभिमान वाटतो” अशा भावना व्यक्त केल्या.
शारदा क्लासेसचे संचालक प्रा. दिगंबर ढोकले यांनी प्रास्ताविकातून, “सुमारे बत्तीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या शारदा क्लासेसने अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना घडविणारी संस्था म्हणून समाजात नावलौकिक मिळविला, हेच संचित गाठीशी आहे ” अशी कृतज्ञता व्यक्त केली.
ह. भ. प. नारायणमहाराज जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “गुरुजन हे ज्ञानदान करताना ज्ञानेश्वरमाउली यांनी सांगितल्याप्रमाणे ‘ये हृदयीचे ते हृदयी’ पोहोचविण्याचे कार्य करीत असतात. मातृ, पितृ, आचार्य आणि समाज देवो भव या वृत्तीने जीवनात व्यवहार केल्यास कर्मयोगी अन् ज्ञानयोगी होण्याचे भाग्य लाभते ” असे विचार व्यक्त केले.
श्री पांडुरंगाच्या मूर्तीचे पूजन करून तसेच आर्या वारके आणि संस्कृती सुतार या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या शारदास्तवनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह सत्कार स्वीकारला; तसेच मान्यवरांच्या मनोगतांमधून आपल्या क्लासचे विविध गुणविशेष ऐकताना टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शारदा क्लासेसचे संचालक प्रा. बाळासाहेब ढमे यांनी सूत्रसंचालन केले. गोरक्ष ढोकले यांनी आभार मानले. सुरेखा साबळे यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.












