न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २८ मार्च) :- मावळ लोकसभेचे महाआघाडीचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी संपूर्ण पवार घराणे प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. अजित पवार यांच्या बहिण निताताई पाटील यांनी गुरुवारी सकाळी काळेवाडी, रहाटणीसह पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी शीतलताई काटे यांच्या निवासस्थानी चहापान करण्यात आले.
यावेळी नगरसेविका शीतलताई काटे, नगरसेवक नाना काटे, शंकरशेठ काटे, अविनाश गैकावाद यांच्यासह परिसरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव मावळ लोकसभेच्या मैदानात उतरले असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष मावळच्या लढतीकडे लागले आहे. स्वतः शरद पवार, अजित पवार, रोहित पवार यांच्यासह आता पार्थच्या आत्या निताताई पाटील यांनीदेखील प्रचारात उडी घेतली आहे. निताताई यांनी गुरुवारी पिंपळे सौदागर परिसरात नगरसेवका शीतलताई काटे यांना सोबत घेवून नागरिकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला. नागरिकांनी देखील त्यांना चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी निताताई पाटील म्हणाल्या कि, पार्थ हा राजकारणात नवीन असला, तरी तो सुशिक्षित उमेदवार असून, त्याच्याकडे दूरदृष्टी आहे. पार्थला आपण काम करण्याची संधी द्या. अजितदादा प्रमाणे तो ही खूप चांगले काम करून दाखवेल. त्यामुळे पार्थ पवार हे आपल्या घरातील उमेदवार आहेत, असे समजून सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.
गेली पाच वर्षात पिंपरी चिंचवड सह मावळ मतदार संघातील कोणतेच महत्वाचे प्रश्न सुटले नसल्याने सर्व नागरिक भाजप शिवसेनेवर नाराज आहेत. त्यामुळे यावेळी आम्ही पार्थ पवार यांनाच पाठिंबा देणार असल्याचा विश्वास देखील यावेळी नागरिकांनी निताताई पाटील यांना दिला.











