न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२३) :- गृहनिर्माण क्षेत्रातील विविध परवानग्या, विकासकाची विश्वासार्हता, विविध करारांतील किचकटपणा याबद्दल फारशी माहिती नसलेल्या ग्राहकालाही घरखरेदीचा निर्णय घेण्यास अधिक सोपे व्हावे, यासाठी काही निर्धारित निकषांच्या आधारे गृहनिर्माण प्रकल्पांचे मानांकन अर्थात रेटिंग ठरविण्याची प्रक्रिया ‘महारेरा’ने सुरू केली आहे. यासाठी महारेराने सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव ‘महारेरा’च्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला असून, त्यावर सर्व संबंधितांच्या सूचना व हरकती दि. १५ जुलैपूर्वी पाठवाव्यात, असे आवाहन ‘महारेरा’ने केले आहे.
‘महारेरा’कडून जानेवारीनंतर नोंदणीकृत झालेल्या प्रकल्पांना ही पद्धत लागू केली जाणार आहे. प्रकल्पांचे मानांकन वर्षातून दोनदा जाहीर केले जाणार असून, १ ऑक्टोबर २०२३ ते मार्च २०२४ मधील माहितीच्या आधारे पहिले मानांकन २० एप्रिल २०२४ पासून उपलब्ध होईल, असा ‘महारेरा’चा प्रयत्न आहे.
आयुष्यभराची कमाई पणास लावून घर घेतले जाते. ‘महारेरा’ या ग्राहकांचे हक्क संरक्षित राहावे, त्यांनी ज्या प्रकल्पात गुंतवणूक केली. प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता, सक्षम यंत्रणेच्या तांत्रिक मंजु-या, प्रकल्पावर सध्या सुरू असणारे खटले, महारेराच्या संकेतस्थळावर विहित कालावधीत विविध अनुपालन अहवाल द्यावे लागतात.
मानांकन ठरविण्यासाठी वरील माहितीच्या आधारे दुस-या आणि अंतिम टप्प्यात प्रकल्पाचे चार महत्त्वांचे स्नॅपशॉटस जाहीर केले जातील. यात ढोबळमनाने प्रकल्पाचा आढावा. प्रकल्पाची तांत्रिक, आर्थिक आणि कायदेविषयक माहितीचे तपशील राहतील. ही माहिती सार्वजनिकरीत्या ग्राहकांना उपलब्ध राहील.














