- अजित पवारांची पत्रकार परिषदेत माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२३) :- राज्याचा सर्वांगीण विकास, राज्याच्या विकासासाठी केंद्रीय निधी जास्त प्रमाणात मिळेल आणि महाराष्ट्रातील जनता समाधानी कशी राहील यासाठी आम्ही निर्णय घेतला आहे. बहुतेक आमदार, लोकप्रतिनिधी आणि पक्ष आमच्या बरोबर आहे, अशी माहिती अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करीत आज दुपारी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आठ आमदारांनीदेखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी आज संवाद साधला. यावेळी अजित पवार, छगन भुजबळ आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, उद्याच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही या सरकार मध्ये सामील झालो आहोत. आगामी जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिका, आमदारकी, खासदारकीच्या निवडणुकांमध्ये पक्षाच चिन्ह आणि नाव आहे त्याच नावाखाली निवडणूक लढविणार असून पक्ष अधिक बळकट आणि वाढविण्याचा प्रयत्न करणार असून त्यासाठी आम्ही मंत्रिमंडळात सहभागी झालो आहोत, असे अजित पवार म्हणाले.
साडेतीन वर्षांपूर्वी आम्ही शिवसेना काँग्रेसबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली होती. आम्ही शिवसेनेबरोबर जाऊ शकतो तर भाजपमध्ये देखील जाऊ शकतो. आम्हाला प्रशासनाचा अनुभव आहे. आज काही आमदार पोहोचू शकले नाहीत. काही लोकप्रतिनिधी परदेशात आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला आहे. काही आज संध्याकाळपर्यंत पोहोचतील. त्यांनी त्याला मान्यता दिली आहे, असेही अजित पवार म्हणाले.
छगन भुजबळ म्हणाले, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणूनच महाराष्ट्र सरकारचा तिसरा घटक म्हणून सामील झालो आहोत. आम्ही राष्ट्रवादी पार्टी सोडली नाही.














