- पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीवर देखील होणार परिणाम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२३) :- पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर उद्यापासून ४ ते १५ जुलै या कालावधीत चांदणी चौक प्रकल्पाच्या मुख्य पुलाच्या (व्हीओपी) गर्डर उभारणीचे काम केले जाणार आहे. त्यासाठी दररोज रात्री साडेबारा ते साडेतीन या कालावधीत मुख्य रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात येणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती आणि जुन्या महामार्गावरील वाहतूक ठराविक ठिकाणी थांबवली जाणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिली.
चांदणी चौकातील पुलाच्या कामाच्या अनुषंगाने वाहतूक वळविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या उपस्थितीत दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. त्याला पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम, पिंपरी चिंचवडचे सहायक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे आदी उपस्थित होते.
पुण्यातील चांदणी चौक जंक्शनवर एकात्मिक संरचना पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, ते अंतिम टप्यात आहे. नवीन एनडीए-पाषाण मुख्य पुलाचे काम सबस्ट्रक्चर पातळीपर्यंत झाले असून, सुपरस्ट्रक्चरचे काम प्रगतिपथावर आहे. या पार्श्वमूीवर पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुन्या महामार्गावरील अवजड वाहतूक तीन तास थांबवण्यात येणार आहे.
अशी असेल वाहतूक व्यवस्था…
१) मुंबईकडून येणारी जड वाहतूक मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर तळेगाव टोलनाका येथे व मुंबई-पुणे जुना महामार्गाने येणारी वाहने सोमाटणे टोल नाका येथे थांबवली जाईल.
२) मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे जुना महामार्ग येथून चारचाकी हलकी वाहने भुजबळ चौक, राजीव गांधी पूल मार्गे व चांदणी चौक विवा हॉटेल या मार्गाने कात्रजकडे जातील.
३) मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग व किवळे पूल ते राधा चौक या दरम्यान येणारी वाहने भुजबळ चौक, राजीव गांधी पूल मार्गे जातील.













