न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जुलै २०२३) :- निगडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. दहावी पास, नापास इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य शशिकांत सावळे यांनी केले. मंगळवार (दि. ११) पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत असणार आहे.
एका विद्यार्थ्याला संपूर्ण राज्यातून कोठेही एकच अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट व मूळ कागदपत्रे घेऊन जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जाऊन प्रवेश अर्ज निश्चित करायचा आहे. त्यानंतरच व्यवसाय निवडीसाठी विकल्प सादर करता येतील. प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी-चिंचवड ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्राच्या केंद्रस्थानी असणारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेत एकूण १४ व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते. नळ कारागीर (७२). पत्रे कारागीर (६०), संधाता आहेत.(१००), आरेखक यांत्रिकी (२०). वीजतंत्री (२०), जोडारी (४०), यंत्र कारागीर (२०) यंत्र कारागीर घर्षक (२०), कातारी (२०) आणि फळे भाज्यावर संस्करण (२४) याप्रमाणे व्यवसाय निहाय जागा उपलब्ध आहेत. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेदरम्यान संस्थेत प्रवेशा संबंधित मार्गदर्शन करण्यात येणार आहे, त्याचा लाभ मुलांनी घ्यावा.
सध्याच्या परिस्थितीत कौशल्य प्राप्त उमेदवारांना रोजगार मिळण्याची मोठ्या प्रमाणावर संधी आहे. स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी तसेच दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर इंजिनिअरिंग पदविका अभ्यासक्रमात प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. तसेच आय.टी.आय. प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्या वेतनात वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयटीआयला प्रवेश घेऊन आपले भविष्य सुरक्षित करावे.
– शशिकांत सावळे, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, निगडी…


















