- भाजपचे अमित गोरखे यांच्या पाठपुराव्याला यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व नाट्यगृहांची भाडेवाढ कमी करावी. याकरिता पिंपरी विधानसभा भाजपा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी प्रशासनाकडे वारंवार अर्ज-विनंत्या केल्या. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून नाट्यगृहांची भाडेवाढ रोखली नाही.
यापूर्वी नाट्यगृहांसाठी जे दर आकारले जात होते, त्यापेक्षा तिप्पट ते चारपट जास्तीचे दर सद्यस्थितीत आकारले जात आहेत. त्यामुळे साहित्यिक व कला प्रेमींचा हिरमोड झाला असून खर्चाचा ताळमेळ कसे बसवावा, या विवंचनेत ते आहेत.
याप्रकणी अमित गोरखे यांनी आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडे शहरातील नाट्यगृहांच्या भाडेवाढी संदर्भात गाऱ्हाणे मांडले. त्यांना याविषयी निवेदन दिले.
याबाबत ते ‘न्यूज पीसीएमसी’शी बोलताना म्हणाले, ” नाट्यगृहांच्या भाडेवाढी संदर्भात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची आज भेट घेतली. या विषयासंदर्भात ते आश्वासक आहेत. ‘लवकरच संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊ. त्याबाबत बैठकीत सकारात्मक तोडगा काढू’, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे, अशी माहिती अमित गोरखे यांनी दिली.














