न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०२३) :- ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं ७४ व्या वर्षी निधन झालं. तळेगाव दाभाडे जवळील आंबी गावात ते भाड्याने राहत होते, तिथेच फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. रवींद्र महाजनी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात आला आहे.
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्यावर ५ वाजता नवी पेठे येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शवविच्छेदनानंतर कुटुंबियांना मृतदेह सोपवला जाईल, त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल.
दरम्यान, महाजनी यांनी ‘मुंबईचा फौजदार’, ‘झूंज’ आणि ‘कळत नकळत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ते त्यांच्या काळातील सर्वात देखणे अभिनेते म्हणून ओळखले जायचे. त्यांना मराठी चित्रपटसृष्टीतील विनोद खन्ना असंही म्हटलं जायचं. रवींद्र महाजनी यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.