न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च) :- मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना पाच वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळालेला आहे. जर बारणे यांना पाच वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार हा त्यांच्या कामांमुळे मिळालेला असेल तर, महायुतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार बारणे हेच असायला हवेत, अशी उपरोधिक टीका पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीचे ब्लॉक अध्यक्ष रमेश नखाते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, ”मावळ लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्षाने आपली कंबर कसलेली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व कॉग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार पार्थ अजित पवार व शिवसेना-भाजप महायुतीचे पाच वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार घेतलेले कर्तव्यशुन्य उमेदवार यांच्यात खरी लढाई आहे.
संसदरत्न पुरस्कार किंवा कुठलाही पुरस्कार चांगले काम केले तरच मिळतो. हे लहान मुल देखील सांगेल. याचाच अर्थ असा होतो की, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यापेक्षा मावळच्या खासदारांनी चांगले काम केले असेल, म्हणून तर त्यांना तो संसदरत्न पुरस्कार पाच वेळा मिळालेला आहे, असे आपण गृहीत धरू. पण महायुतीचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आज मतदार संघातील कामे लोकांच्या समोर घेऊन जाण्याऐवजी, स्थानिक भूमिपुत्र आणि इतर भावनिक मुद्दे घेऊन मतदारांना सामोरे जात आहेत. मग पाच वेळा संसदरत्न पुरस्कार काय भूमिपुत्र म्हणून मिळवला?
म्हणुन मी तर, म्हणतो जे मोदींना जमले नाही ते खासदारांनी करून दाखवले आहे. तर मग बारणे यांनाच का नाही तुम्ही पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरवत. मी भाजपा व शिवसेना पक्षांच्या नेते मंडळींना विनंती करतो की, पाचवेळा संसदरत्न पुरस्कार घेणाऱ्या मावळ लोकसभेतील उमेदवारास पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणुन घोषीत करावे. म्हणजे मतदारांपुढे जायला तुम्हाला अजून एक भावनिक मुद्दा सापडेल ही मनापासून विनंती” असे या पत्रात नखाते यांनी म्हटले आहे.










