न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२३) :- तीर्थक्षेत्र आळंदी – देवाची परिसरात वातावरणातील बदलामुळे सहा ते सोळा वर्ष वयोगटातील मुला – मुलींचे डोळे येण्याची साथ पसरली आहे. आळंदी ग्रामीण रुग्णालय कार्यक्षेत्रात आठवड्याभरात सुमारे १ हजार ७०० पेक्षा अधिक शाळकरी मुलांना या साथीच्या आजाराला सामोरे जावे लागले आहे.
यापार्श्वभूमीवर तालुका आरोग्य प्रशासन व आळंदी ग्रामीण रुग्णालय अलर्ट झाले असून आवश्यक त्या उपाययोजना कार्यान्वित केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा पारखे व वैद्यकीय अधिक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी दिली.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे डोळे येण्याची साथ वाढत आहे. हा आजार साथीच्या स्वरूपात असल्याने विद्यार्थ्यांनी एकत्र न येता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. आळंदीत अनेक वारकरी विद्यार्थ्यांच्या संस्था आहेत. या साथीत वारकरी विद्यार्थी जादा बाधित असल्याचे दिसून येत आहे. मात्र बाधित विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर एकमेकाशी संपर्क आल्याने इतरांचेही डोळे येण्याचे प्रमाण वाढत आहे. डोळे आल्याची लक्षणे आढळून आल्यास वेळीच नेत्रचिकित्सकांकडून डोळ्याची तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे स्थानिक डॉक्टरांनी सांगितले.












