न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जूलै २०२३) :- मुरबाड (ठाणे) येथून मुंढवा पुण्याकडे द्रवरुप ऑक्सिजनची वाहतुक करणारा केए-०१-एडी-९८३० असा वाहन क्रमांक असलेला टॅंकर (दि. २७) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास निगडीतील भक्ती शक्ती ब्रिज उतरत असताना पवळे ब्रिज अंडर ग्राऊंडचे काम चालु असलेल्या ठिकाणी एसबीआय बँकेच्या समोर रस्ता दुभाजकाला धडकून अपघातग्रस्त झाला.
आरोपी वाहन चालकाने वाहन हयगयीने भरधाव वेगाने निष्काळजीपणे, रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत चालवले. अपघातात आरोपीबरोबर असलेल्या हेल्परच्या डोक्यास दुखापत झाली. वाहनाचे नुकसान आणि अपघातास आरोपी वाहनचालक कारणीभूत झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी शिवशंकर छोटेलाल पांडे (वय- ५७ वर्ष, धंदा- ड्रायव्हर, रा- गाव- उदरी मानापुर, पो- मलीकपुरनोनरा, ता- कालीपुर, जि- सुलतानपुर, उत्तरप्रदेश) याच्याविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात ४६५ / २०२३ भा.दं.वि. कलम २७९,३३७, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि मुत्नाळे हे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.















