- आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 1 ऑगस्ट 2023) :- लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी सन्मानित केले जाणार आहे. पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या सोहळ्याला विरोधी पक्षांचा विरोध झुगारून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील व्यासपीठावर असणार आहेत.
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक ज. टिळक, ट्रस्टचे विश्वस्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे सकाळी १०.१५ वाजता लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे ते दर्शन घेतील. त्यानंतर लोकमान्य टिळक पुरस्काराचे वितरण स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. नंतर शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालय येथील मैदानावर कार्यक्रम होणार आहे. त्यात विविध प्रकल्पांचे उद्घाटन होईल.
मेट्रो १ च्या फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय आणि गरवारे स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन मार्गिकांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. २०१६ मध्ये मोदींच्याच हस्ते पायाभरणी झाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘वेस्ट टू एनर्जी मशीन’चे उद्घाटन करणार आहेत. पिपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राची निर्मिती करण्यात आली आहे. सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या या संयंत्राच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे २.५ लाख मेट्रिक टन कचरा वापरून वीज निर्मिती केली जाणार आहे.
पुणे महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वडगाव खुर्द, हडपसर, खराडी येथे बांधलेल्या २६५८ घरांचे लोकार्पण होणार आहे. योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड पालिकेने बांधलेल्या १ हजार २८० हून अधिक घरांचे लोकार्पण होईल. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या ६ हजार ४०० घरांचे भूमिपूजन होणार आहे.