न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ एप्रिल) :- मावळ आणि शिरूर मतदारसंघासाठी आजपासून अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असल्यामुळे खऱ्या अर्थाने निवडणुकीचा आखाडा रंगण्यास प्रारंभ होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील चार मतदारसंघापैकी बारामती आणि पुणे या मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान होत असून, या ठिकाणी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तर त्या पाठोपाठ आता मावळ आणि शिरूरमध्येही सुरुवात झाली आहे. मावळ आणि शिरुरसाठी २ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत अर्ज भरता येणार असून, १० एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी ११ व १२ एप्रिल हा कालावधी राहणार असून, अर्ज मागे घेण्यासाठी दोन दिवसांचा वेळ उमेदवारांना देण्यात आला आहे.
आज मंगळवार (दि. २) रोजी मावळ लोकसभा मतदारसंघासाठी प्राधिकरणाच्या इमारतीतील ७ व्या मजल्यावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून पहिल्याच दिवशी १४ इच्छुकांनी अर्ज नेल्याचे जनता संपर्क अधिकारी गौरी पवार यांनी सांगितले. तर शिरुरसाठी पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सातव्या मजल्यावरून अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात असलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून शिरुरसाठी १८ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांनी सांगितले आहे.
…असा आहे निवडणूक कार्यक्रम
२ ते ९ एप्रिल – उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी
१० एप्रिल – उमेदवारी अर्जांची छाननी
११ ते १२ एप्रिल – उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी
२९ एप्रिल – मतदान
२३ मे – मतमोजणी आणि निकाल










