न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२३) :- मावळ तालुक्यातील कांब्रे नामा या गावात शेतामध्ये भातातील गवत काढत असताना, अंगावर विद्युत वाहिनी तुटून पडल्याने शेतकऱ्याचा विजेच्या शॉकने जागीच मृत्यू झाला.
शेजारील शेतात काम करणाऱ्या व्यक्तीने ही माहिती त्याच्या कुटुंबाला दिली. ही घटना आज शनिवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली. श्रीकांत गणपत गायकवाड (वय ३३) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. श्रीकांत हा खाजगी कंपनीत चिंचवड येथे काम करत होता. शनिवारी व रविवारी सुट्टी असल्याने तो शेतात कामाला गेला होता.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. या घटनेने मावळत शोककळा पसरली आहे.