- रस्त्यांची दुर्दशा, स्वच्छतागृहांअभावी भाविकांची होतेय कुचंबना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२३) :- देहूगावात भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात तसेच परिसरातील रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. अन्नदान मंडळाच्या वतीने आमदार सुनील शेळके यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, देहूगावात दररोज हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे महिलांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह तयार करावे. तसेच, तीर्थक्षेत्र देहूगावाकडे येणाऱ्या प्रमुख तीन रस्त्यांची खूपच वाईट परिस्थिती झाली आहे. देहूरोड ते देहूगाव, तळेगाव-चाकण-देहूफाटा आणि देहूगाव ते आळंदी या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे वाहन चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे.
राज्याच्या काना कोपऱ्यातून वारकरी भाविक देहूत दर्शनासाठी येत असतात. परंतु, रस्ते खराब असल्यामुळे त्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे या तीन प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम त्वरित करावे, अशी मागणी आमदार सुनील शेळके यांच्याकडे करण्यात आली आहे.
वारकरी भाविकांसाठी लवकरात लवकर अद्ययावत स्वच्छतागृह तयार करण्यात येईल. तसेच, रस्त्यांच्या दुरुस्तीचे कामही युद्धपातळीवर करण्यात येईल, असे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी दिले आहे.














