न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध ११ पदांच्या ३५ जागांचा निकाल सोमवारी (दि. ७) www. pcmcindia. gov. in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्रिशमन अधिकारी, विभागीय अग्रिशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक (वृक्ष) (प्रत्येकी १ जागा) उद्यान निरीक्षक (३ जागा), हॉर्टीकल्चर सुपरवायझर (८ जागा), कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर, समाजसेवक (प्रत्येकी २ जागा), आरोग्य निरीक्षक (१३ जागा) ही पदे आहेत.
या पदासाठी पालिकेकडून मे महिन्यात राज्यभरात ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी एकूण ४ हजार २३१ अर्ज दाखल झाले होते. परीक्षेला २ हजार ६७९ उमेदवार बसले होते. त्यानंतर जून महिन्यात परीक्षेचे | गुण जाहीर करण्यात आले. त्यावर आक्षेप स्वीकारून सुनावणी घेण्यात आली. आज महापालिकेच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर ४ ते ५ दिवसांनी आरक्षणासह यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल, तर निवड समितीच्या बैठकीत अंतिम यादी तयार केली जाईल. अंतिम यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर पोलिस व्हेरिफेकेशन तसेच, आरोग्य तपासणी होऊन पात्र उमेदवारांना निवडीचे पत्र दिले जाईल, हे करताना परीक्षेच्या ठिकाणी घेतलेल्या डोळ्याची प्रतिमा आणि आताची डोळ्याची प्रतिमा एकच असल्याची खातरजमा केली जाणार आहे.
नोकरभरतीच्या काळातच यूपीएसची परीक्षा असल्याने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, लिपिक या चार पदांची परीक्षा काही उमेदवारांसाठी नंतर घेण्यात आली. त्या पदांचा निकाल १५ ऑगस्टपर्यंत जाहीर केला जाणार आहे, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.














