- नदीपात्र स्वच्छ करण्याची ग्रामस्थांची मागणी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. ३ एप्रिल) :- आंबी, वराळे गावच्या हद्दीतील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्याचे धोकादायक रासायनिक पाणी तसेच काही गावातील दूषित सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रात सोडल्याने नदीला गटारगंगेचे स्वरुप आले आहे.
इंद्रायणी नदीच्या पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येत असून, नदीचे पाणी जलचर, प्राणी व मानवी आरोग्यस धोकादायक झाले आहे. नदीपात्रात सोडले जाणारे रासायनिक व दूषित सांडपाणी रोखून नदीपात्रातील जलपर्णी काढून नदीचे पात्र स्वच्छ करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मावळ तालुक्यातील इंद्रायणी, पवना, कुंडलिका, सुधा, आंद्रा या नद्यांचे पात्र पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात. या नद्यांच्या पाण्यावर काठावरील अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याची नळ पाणीपुरवठा योजना आहेत. परंतु, सध्या या नद्यांचे पाणी दूषित झाले असून, जलचर, प्राणी आणि मानवी आरोग्यास धोकादायक ठरत आहे.










