न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२३) :- रुग्णसंख्या वाढत असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. रुग्णालयामध्ये ३५० सुसज्ज बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय टळणार असल्याचे वैद्यकीय विभागाने सांगितले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने कोरोनामध्ये चार सुसज्ज रुग्णालये सुरू केली. त्यामध्ये २०० बेडचे थेरगाव रुग्णालय, १३० बेडचे हभप कै. प्रभाकर मल्हारराव कुटे आकुर्डी रुग्णालय, १२० बेडचे नवीन जिजामाता रुग्णालय, १०० बेड्चे नवीन भोसरी रुग्णालय अशी चार रुग्णालय उभारण्यात आली आहेत.
या रुग्णालयांमध्ये शहरातील रुग्णांची गर्दी वाढत आहे. थेरगाव रुग्णालयामध्ये महिन्याकाठी १४ हजार रुग्ण ओपीडीमध्ये दाखल होत असल्याचे अधिकारी सांगत आहेत. या ठिकाणी अद्ययावत स्त्रीरोग विभाग सुरु केला आहे. त्यामुळे प्रसूतीसाठी महिला रुग्णांची मोठी संख्या आहे. वाढणारी लोकसंख्या पाहता जादा बेडची सुविधा देण्यात आली आहे.















