- रसायनमिश्रित पाणी सोडणाऱ्यांचे धाबे दणाणणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२३) :- पवना नदीपात्रात रावेत बंधार ते केजुदेवी बंधारा दरम्यान कोणीतरी रसायन मिश्रीत पाणी सोडल्यामुळे नदीपात्र फेसाळल्याचा नुकताच प्रकार घडला. शहरालगतच्या भागातील काही व्यवसायिकांकडून टँकरद्वारे रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याचा संशय आहे. त्याठिकाणी नदीला जोडणाऱ्या दोन नाल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.
पवना नदीपात्रालगत एकही कंपनी सध्या सुरू नाही. त्यामुळेच सोमवारी (दि. २१) सकाळी पवनेचे पात्र फेसाळल्याचे निदर्शनास आले. आम्ही त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. सर्वेक्षणात दोन्ही नाल्यांमधून रसायनमिश्रित पाणी येत असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नदीपात्राला येऊन मिळणाऱ्या दोन्ही नाल्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याद्वारे मध्यरात्री कोणीही रसायनमिश्रित पाणी सोडताना आढळल्यास त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सह शहर अभियंता कुलकर्णी यांनी सांगितले.
या भागातील व्यवसायिकांना नोटिसा पाठवून रसायन मिश्रित पाणी सोडल्यास कारवाई केली जाणार असल्याचे कळविले आहे. त्यामुळे नदीपात्रालगत असा प्रकार घडणे शक्य नाही. मात्र, रावेत बंधारा ते केजुदेवी बंधारा परिसरात दोन नाले नदीपात्राला येऊन मिळतात. दोन्ही नाल्यांना परिसरातील ड्रेनेज लाइन जोडल्या आहेत. मध्यरात्री या कंपनी सध्या सुरू नाही. बहुतांश नाल्याद्वारे कोणीतरी रसायन मिश्रित पाणी नदीपात्रात सोडत असल्याचा संशय आहे.












