न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२३) :- प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे म्हटले आहे. सचिन तेंडुलकरनं भारतरत्न पुरस्कार परत करावा, नाहीतर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराच त्यांनी दिला आहे.
सचिन तेंडुलकरनं ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती करण्यावर बच्चू कडूंनी आक्षेप घेतला होता. “भारतरत्न असणाऱ्या माणसानं कोणत्या जाहिराती कराव्यात किंवा करू नयेत याच्या काही आचारसंहिता आहेत. त्यामुळे फक्त पैशांसाठी जाहिरात करून पुन्हा तरुणाईला या ऑनलाईन गेमिंगला बळी पाडलं जात असेल तर त्याचा आम्ही विरोध करू”, असं बच्चू कडू म्हणाले होते. आता त्यांनी सचिननं भारतरत्न परत करण्याची भूमिका मांडली आहे.
“सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण त्यांना भारतरत्न मिळाला आहे. त्यांनी ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करणं हे अत्यंत वाईट आहे. एखादी मोठी व्यक्ती जेव्हा जुगारासारख्या वाईट गोष्टीची जाहिरात करत असेल आणि त्याचा प्रभाव आमच्या युवकांवर पडत असेल, घरं बरबाद होत असतील, तर ते अयोग्य आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.












