न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ एप्रिल) :- संसदेत फक्त प्रश्न मांडून उपयोग होत नाही, तर मांडलेल्या प्रश्नांचा पाठपुरावा करुन, प्रत्यक्ष किती प्रश्नांची सोडवणूक झाली याला महत्व आहे, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शनिवारी (दि. ६) रोजी वाकड, पुणे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे पिंपरी चिचंवड शहर अध्यक्ष नितीन बनसोडे, कार्याध्यक्ष हरीष मोरे, माजी नगरसेवक सतिष दरेकर, उन्मेश पाटील, राहुल पोकळे, उपाध्यक्ष भालचंद्र फुगे, महिला अध्यक्षा छाया देसले, शहर संघटक सुभाष साळुंखे, विकी गोरे, संतोष जंगम, सागर आल्हाट, राहुल पडवळ, राजेंद्र देवकर, संजय साळुंखे, सारिका फुगे, मालन बनपट्टे, संजय भालके, अशोक इंगळे, सिता जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणा-या केंद्र सरकारच्या कार्य पध्दतीला कंटाळून पाच वर्षात भारतीय रिजर्व्ह बँकेच्या चार गर्व्हनरांनी राजीनामे दिले. भारत स्वतंत्र झाल्यापासून प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी माध्यमांसमोर येऊन नाराजी व्यक्त केली. एका रात्रीत निर्णय घेऊन देशभरातील जनतेवर नोटाबंदी लादली. त्यामुळे देशाची आर्थिक व्यवस्था ठप्प झाली आहे. शेतक-यांचे कर्जमाफी झाली नाही, पिंपरी चिंचवड शहरातील अनाधिकृत बांधकामाचा प्रश्न, रिंग रोड, रेझ झोनचा प्रश्न देखील युती सरकारला सोडविता आला नाही. राष्ट्रवादीच्या काळात केंद्रीय माजी मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड स्वच्छ आणि स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जात होती. आता शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. मोदींच्या व युती सरकारच्या या कार्यपध्दतीला विरोध करण्यासाठी आणि पुरोगामी मतांची विभागणी होऊ नये, कोणत्याही अटी शर्ती शिवाय शेतकरी कामगार पक्षाने देशभर आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला, असेही जयंत पाटील म्हणाले.
मुंबईत विमानतळ उभारण्यासाठी बाधित झालेल्या शेतक-यांना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच साडेबावीस टक्क्यांचा जमिनीचा परतावा देण्यात आला. पिंपरी चिंचवड, मावळ प्रमाणेच कर्जत, उरण, पनवेल येथील नागरिकांची शरद पवारांची नाळ जुळलेली आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणूकीत आघाडीचे उमेदवार पार्थ पवार नक्कीच निवडून येतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
मावळ लोकसभेतील तीन विधानसभा मतदार संघात शेकापचा प्रभाव आहे. मागील निवडणूकीत मोदी लाट असतानाही अपक्ष उमेदवारांला पंचवीस हजारांहून जास्त मताधिक्य शेकापने मिळवून दिले होते. या निवडणूकीत आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना त्याहून जास्त मताधिक्य मिळवून देऊ, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. शेकापने वर्गणी गोळा करुन दुष्काळाच्या काळात मराठवाड्यात बावीस कोटींची विकास कामे केली आहेत. मोदी सरकारवर टिका करताना जयंत पाटील म्हणाले की, नोटाबंदी नंतर आरबीआयच्या गर्व्हनरांना प्रथमच केंद्रीय लोक लेखा समिती समोर हजर राहून जबाब देण्याची नामुष्की आली. मोदी सरकार केंद्रीय संस्थांचे संवैधानिक महत्व कमी करीत आहे. देशभरातील सुज्ञ मतदार आता आघाडीच्या पाठीशी उभा राहिल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.










