- रोव्हर मशीन ही सॅटेलाइटच्या माध्यमातून चालणारे यंत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२३) :- पूर्वी जमीन मोजणी ही टेबल किंवा ईटीएस पद्धतीने होत होती. यामुळे मोजणी करण्यासाठी प्रचंड वेळ लागत होता. मोजणी प्रक्रिया ही किचकट होती. यावर शासनाने उपाय शोधून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रोव्हर्स यंत्राद्वारे मोजणी सुरू केली आहे. रोव्हर मशीन ही सॅटेलाइटच्या माध्यमातून चालवणारे यंत्र आहे. या यंत्राद्वारे जमिनीची अचूक मोजणी होऊन रियल को-ऑर्डिनेट मिळत असतात. आता रोव्हर उपकरणामुळे अचूक जमीन मोजणी होत आहे.
पूर्वीची जमीन मोजणी प्रक्रिया किचकट आणि वेळकाढूपणाची होती. त्यामुळे जमीन मोजणी केल्यानंतरही अनेकदा वाद निर्माण होत होते. रोव्हर वापरून केलेल्या मोजणीने संबंधित जमिनीचे अक्षांश रेखांश मिळतात. भूकंप झाला. पूर आला, दगड खुणा वाहून गेल्या, तरी अक्षांश रेखांश असल्यामुळे पूर्वीच्या हद्दी दाखवता येतात. रोव्हर हे शेतजमीन मोजण्याचे आधुनिक यंत्र आहे. रोव्हर मशीन हे सॅटेलाइटच्या माध्यमातून जीपीएस प्रणालीद्वारे चालणारे यंत्र आहे. या यंत्राद्वारे जमिनीची अचूक मोजणी होते. रोव्हर हा एक मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे. तो शेतात घेऊन जाता येतो. त्याचे कनेक्शन सॅटेलाईटशी आहे. त्यामुळे कुठेही गेलात, तरी तो रोव्हर स्टेशन स्थानाशी जास्तीत जास्त अचूकता दर्शवतो.
रोव्हरमुळे जमीन मोजणीत अचूकता आणि पारदर्शकता आली आहे. मोजणीचे कामही झटपट होते. जमीन मोजणीचे काम करण्यासाठी ९ भूमापक आहेत. इतर कर्मचारी मदतीने जमीन मोजण्याचे काम केले जाते. रोव्हर मशीन आल्यापासून सहा महिन्यांत १ हजार तीनशेपेक्षा अधिक जमीन मोजणी प्रकरणे निकाली निघाली आहेत.
– पल्लवी पाटील पिंगळे, उपअधीक्षक भूमी अभिलेख, मावळ…