न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२३) :- महापालिकेच्या साडेसहा हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस व सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. या निर्णयामुळे दिवाळीच्या एक महिना अगोदरच अधिकारी, कर्मचाऱ्यांना गोड बातमी देऊन त्यांची दिवाळी आयुक्तांनी आणखी गोड केली आहे.
साडेआठ टक्के सानुग्रह अनुदान आणि वीस हजार रुपये बोनस कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. त्यासाठी ५५ कोटी रुपये लागणार आहेत. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना किमान चाळीस हजार रुपये आणि वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना किमान अडीच लाख रुपये बोनस मिळणार आहे. मात्र, सहा महिन्यांपेक्षा कमी सेवा झालेले नवीन कर्मचारी आणि अधिकारी यापासून वंचित राहणार आहेत. मानधनावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही वीस हजार रुपये दिले जाणार आहेत.
२०२१ च्या ठरावानुसार महापालिका कर्मचारी महासंघाच्या मागणीनुसार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान व जादा रक्कम देण्याचा ठराव, तत्कालीन स्थायी समिती व सर्वसाधरण सभेने ऑक्टोबर २०२१ मध्ये घेतला होता. त्या ठरावानुसार, २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५ या पाच वर्षांच्या कालावधीत दरवर्षी ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान आणि २० हजार रुपये बोनस दिले जात आहे. त्या ठरावाची अंमलबजावणी आयुक्तांनी केली आहे.
महापालिकेच्या बालवाडी शिक्षकांनाही बोनस दिला जाणार आहे. मात्र, त्यासाठी २० हजार रुपये भागिले ३६५ दिवस आणि गुणिले हजर दिवस असे सूत्र मांडले आहे. त्यानुसार होणारी रक्कम बालवाडी शिक्षकांना दिली जाणार आहे.
‘‘दरवर्षी महापालिकेच्या वर्धापनदिनी बोनस जाहीर करण्याची म्हणजे त्याबाबतचा आदेश काढण्याची महापालिकेत गेल्या वीस वर्षांपासूनची परंपरा आहे. ती यावेळीही पाळली गेल्याने कर्मचारी सुखावला असून आनंदित झाला आहे.’’
– बबनराव झिंजुर्डे, अध्यक्ष, महापालिका कर्मचारी महासंघ..‘‘महापालिकेच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पाच सानुग्रह अनुदान व जादा रक्कम (बोनस) देण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार पात्र कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीपूर्वी रक्कम देण्याची दक्षता घेण्याबाबत लेखा विभागाला सांगितले आहे.’’
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका..


















