न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ नोव्हेंबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहरात प्रशस्त रस्ते असूनही वाहतूक कोंडी होत आहे. तसेच, लहान व मोठे अपघातांची संख्या कायम आहे. रस्ते सुरक्षित व्हावे म्हणून महापालिका शहरातील वर्दळीच्या चौकांचे परीक्षण करण्यात येणार आहे. परीक्षणानंतर आवश्यक त्या सुधारण्यात येणार आहेत.
शहरात झपाट्याने लोकवस्ती वाढत असून, लोकसंख्येत मोठी भर पडत आहे. परिणामी, खासगी वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे वाहतूक वाढत आहे. त्यामुळे शहरातील प्रशस्त रस्ते वाहतुकीस अपुरे ठरत आहेत.
तसेच, शॉपिंग मॉल, हॉटेल, मंगल कार्यालय, भाजी मंडई, चित्रपटगृह, रुग्णालय, उद्यान, बस स्थानक, व्यापारी संकुल, चौक आदी ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. तसेच, अतिक्रमण, भिकारी व विक्रेत्यांची वाढती संख्या रस्त्यांवर वाहनांचे पार्किंग आदी कारणांमुळे कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे लहान-मोठे अपघात होत आहेत.
चौकांमधील वाहतूक कोंडीचीही समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिका शहरातील चौकांचे सर्वेक्षण करणार आहे. त्यात रस्ता सुरक्षा परीक्षण करणार आहे. त्यासाठी खासगी सल्लागार नेमला जाणार आहे. तसा प्रस्ताव स्थापत्य प्रकल्पाने सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता.
या नवीन कामाचे लेखाशिर्ष तयार करून ५० लाख रकमेची तरतूद करण्यात आली आहे. तो निधी कमी पडत असल्याने त्यात १० लाखांची वाढ करण्यात आली आहे. या वर्गीकरणास आयुक्त शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता नुकतीच दिली आहे. शहरातील अनेक चौकांत वाहतुक कोंडी होत आहे. चौकांतील है अडथळे दूर करून सुरक्षित वाहतुक रहदारी करण्यासाठी खासगी एजन्सी नेमून परीक्षण केले आणार आहे.
परीक्षणानंतर प्राप्त झालेल्या अहवालानंतर महापालिका तशा सुधारणा करणार आहे. त्यामुळे चौकांती वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे, असे महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाचे सहशहर अभियंता प्रमोद ओंबासे यांनी सांगितले.













