न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२३) :- यमुनानगर, निगडी येथील शांताराम बबन बोऱ्हाडे यांनी जानेवारी २०२३ मध्ये देशाचे पंतप्रधान आणि केंद्रीय आरोग्यमंत्री यांना पत्र लिहिले होते. त्यामध्ये देशातील वाढत्या कर्करोगाच्या प्रमाणावर आळा घालण्यासाठी कर्करोग नियंत्रण अभियान राबविण्याबाबत विनंती केली होती. या पत्राची केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून दखल घेण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र बोऱ्हाडे यांना प्राप्त झाले आहे.
बोऱ्हाडे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले होते की, मागील काही दिवसात देशात कर्करोगाचे रुग्ण वाढल्याचे आढळले आहे. सुषमा स्वराज, मनोहर पर्रीकर, अरुण जेटली, शरद पवार यांच्यासह यादी फार मोठी आहे. औषध शोधण्यासाठी व संशोधन करण्यासाठी सरकारने अनेक संस्था उभारल्या आहेत. मात्र, कर्करोगावर औषध शोधण्यात आपण अपयशी ठरलो आहे. या रोगाशी लढा देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रात म्हटले आहे, केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग निर्मूलन व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना उपाययोजनात्मक व आर्थिक साहाय्य करण्यात येते. त्यात तोंडाचा कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भाशयाचे कर्करोग यांचा समावेश आहे. त्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबवून आरोग्यविषयक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.













